‘…ही तर काँग्रेसच्याच जाहीरनाम्याची अंमलबजावणी’
मडगाव :
कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एका आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वागतार्ह पाऊल आहे. परंतू त्यासाठी जानेवारीपर्यंत का थांबायचे? आताच अधिसूचना जारी करा. डॉ प्रमोद सावंत खरे बोलले. भाजपच्या मंत्री आणि आमदारांनी कधीही नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी नोकऱ्या विकल्या, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मेगा जॉब फेअरमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, युरी आलेमाव यांनी भरती घोटाळ्यांवरून भाजप सरकारवर निशाणा साधला व नगरपालीका नगराध्यक्ष निवडणुकीत सत्ता बळकावण्यासाठी अध्यादेश आणण्यात भाजप सरकारने जी तत्परता दाखवली, तीच तत्परता आता कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती करण्यात दाखवली पाहिजे, असा टोला हाणला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत खरे बोलले आहेत. त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. भाजपच्या मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी कधीही लायक तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत, त्यांनी केवळ नोकऱ्या विकल्या.
नोकरभरती घोटाळ्याला मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद होते हे उघड आहे. कर्मचारी निवड आयोगाला डावलून परस्पर खातेनीहाय भरतीद्वारे नोकऱ्यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी २०२१ मध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली होती, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
उशीराने का होईना तरी ही चांगली सुरुवात आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या “गोवा व्हिजन २०३६ रोडमॅप” मधील प्रत्येक शब्द वाचून त्याची अंमलबजावणी सुरू करावी. हा रोडमॅप प्रख्यात तज्ञांनी तयार केलेल्या गोवा व्हिजन २०३५ दस्तऐवजावर आधारित आहे. यामुळे बेरोजगारीचे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि गोव्याचे प्रगतीशील राज्यात रूपांतर होईल, असे युरी आलेमाव म्हणाले.
कर्मचारी निवड आयोगाच्या अंतर्गत सर्व भरती आणण्याची अधिसूचना त्वरित जारी करावी. जानेवारीपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, आजपासूनच नोकरभरतीत पारदर्शकता येऊ द्या, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीतील १३० संपकरी कामगारांकडेही मला मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधायचे आहे. त्यांच्या सेवा नियमित व्हाव्यात यासाठी सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील युवकांच्या सोयीसाठी गोव्यातील तरुणांना बळीचा बकरा बनवू देणार नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.