‘काणकोण कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करा’
काणकोण:
शहरातील कदंब बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती करा, अशी मागणी कॉंग्रेसचे सचिव जनार्दन भंडारी यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नाटो यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 14 दिवसांच्या आत दुरुस्ती कामाला सुरवात न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला आहे.
2004 साली या बसस्थानकाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उदघाटन केले होते. त्यावेळी या बसस्थानकाच्या देखभालीसाठी सर्व खर्चाची तरतूद केली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले होते. शहरा बसस्थानक परिसरात अनेक दुकाने असून येथे वाहनतळही आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी शुल्क आकारण्यात येते. त्यातून महामंडळाला वर्षाकाठी 30 लाखांचा महसूल मिळतो. मात्र, महामंडळ बसस्थानकाच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
सध्या या बसस्थानकाच्या गटारावरील लोखंडी जाळ्या तुटल्या असून त्यात बसचे चाक अडकून अपघात घडले आहेत. त्याशिवाय ही तुटलेली जाळी प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. येथील प्रसाधनगृह दुर्लक्षित आहे. त्यामूळे यात संभाव्य अपघाताची शक्यता पाहता ते तातडीने पुर्वस्थितीत येणे आवश्यक आहे.