यंदाचा महोत्सव अधिक भव्य दिव्य होत आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी प्रथमच 79 देशांतील 280 पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून सुमारे 500 पेक्षा जास्त चित्रपटांचे प्रदर्शन अपेक्षित आहे.
आज मुख्य आयोजक राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे सीईओ रवींद्र भाकर आणि गोवा मनोरंजन सोसायटीच्या श्वेतिका सचन यांनी कर्टन रेझर पत्रकार परिषदेत २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त, म्हणजे 50 ते 60 पेक्षा जास्त महिलांचे चित्रपट इफ्फीमध्ये रसिकांना पाहता येतील. 220 पेक्षा जास्त भारतीय आणि 118 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
यात अजय देवगन, मनोज वाजपेयी, सुनील शेट्टी, प्रभू देवा, अक्षय खन्ना, यामी गौतम, एलिना डिक्रुझ, वरूण धवन, नवाजुद्दिन सिद्दिकी यांचा समावेश आहे. दरम्यान महोत्सवस्थळी 19 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.
यंदा प्रथमच अनेक उपक्रमांची रेलचेल असून गोवन विभागात 7 लघुपटांचे प्रदर्शन होईल. चार कॅरेवॉनच्या साहाय्याने ठिकठिकाणी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय मडगाव रवींद्र भवन, मिरामार किनारा, आल्तिनो जॉगर्स पार्क येथेही खुल्या जागेत चित्रपटांचे प्रदर्शन होईल. शिवाय फिल्म बाजारमध्येही अनेक उपक्रम असून प्रथमच आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि खरेदीदारांना चित्रपटांचे प्रदर्शन पाहता येणार आहे. ‘मास्टर क्लास’मध्ये देशी आणि विदेशी दिग्गजांकडून नवीन दिग्दर्शकांना मार्गदर्शन घेता येणार आहे.
आतापर्यंत चित्रपट महोत्सव संचलनालय या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी पार पडत असे. यंदा प्रथमच ‘एनएफडीसी’ हे काम करत आहे. यंदा कोणीही प्रमुख पाहुणे नसतील. मात्र, राज्यपाल, खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री उदघाटन आणि समारोप समारंभाला उपस्थित असतील. शिवाय चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असेल, अशी माहिती ‘एनएफडीसी’च्या वतीने देण्यात आली.
तापर्यंत देशभरातील 5,949 सिने प्रतिनिधींनी महोत्सवासाठी नावनोंदणी केली आहे. तर 515 पत्रकार महोत्सवाच्या वार्तांकनासाठी उपस्थित राहाणार आहेत. सिने प्रतिनिधींची ही संख्या वाढून 7 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीच्या वतीने देण्यात आली.
Latest News IFFI 2022: 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, या महोत्सवासाठी यंदा माहिती आणि प्रसारण खात्याकडून 40 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून गोवा मनोरंजन सोसायटीकडून सुमारे 17 कोटीपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.
अर्थात हा खर्च अंदाजे असल्याचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे सीईओ भाकर यांनी सांगितले असले, तरी यंदाचे इफ्फीचे बजेट ‘अव्वाच्या सव्वा’ आहे, असेच म्हणावे लागेल. कारण इफ्फीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत जास्त खर्च आहे.