‘प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा’
प्रतापसिंह राणे यांचा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना पूर्वीही पाठिंबा होता व आजही आहे. त्यामुळे सत्तरीत यंदा नाईक यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. ते येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक होते.
सत्तरीत प्रतापसिंह राणे हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत जाणवणार नाही का असे विचारल्यावर त्यांनी थेटपणे सांगितले, मी कालच त्यांच्याशी प्रतापसिंह यांच्याशी) बोललो. त्यांनी मला सांगितले की, सदोदित त्यांनी नाईक यांना पाठिंबा दिला आहे.
ते तुम्ही मी सांगतो म्हणून प्रसिद्ध करू शकता. प्रतापसिंह यांनी राज्याचा विकास केला. त्यांचा एक काळ होता. 1980 ते 1990 पर्यंतच्या विकासावर त्यांची छाप आहे.
तो विकास काँग्रेसने केला असे म्हणता येणार नाही, त्याचे श्रेयही घेता येणार नाही. प्रतापसिंह राणे यांचे व्यक्तिमत्व सर्वमान्य होते. त्याचमुळे आजही अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
मी भाजपमध्ये आलो तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला आहे. त्याचवेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा स्वीकारली आहे. होय, मी आता संघाचे आणि भाजपचे काम करतो. कोणताही पक्ष स्वीकारताना त्याची विचारधारा आधी स्वीकारावी लागते. ते मी केले आहे, असेही विश्वजीत राणे यांनी सांगितले.