
भाजप आणि मगो यांच्यातील प्रदेश पातळीवरील वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी आता प्रदेश पातळीवरील नेत्यांना सबुरीचा सल्ला देणार की ‘एकला चलो रे’ या भूमिकेला समर्थन देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युतीला अलीकडे जात असलेल्या तड्यांची माहिती आता थेट दिल्लीत पोहोचली आहे.
मांद्रे आणि प्रियोळ मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या मगोविरोधी भूमिकेविषयी मगोचे नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर आणि अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्याशी दिल्लीत सखोल चर्चा केली.
मांद्रे मतदारसंघातील भाजप मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘यापुढील निवडणुकीत मांद्रेत भाजपचा उमेदवार व आमदार असेल’ असे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात सध्या तेथे मगोचे जीत आरोलकर हे आमदार आहेत. तर, प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘युतीत राहायचे नसेल तर आत्ताच चालते व्हा’ अशा आक्रमक भाषेचा प्रयोग केला होता. त्यानंतर प्रियोळचे आमदार आणि मंत्री गोविंद गावडे यांनी मगो नेत्यांवर तोंडसुख घेतले होते. त्यांना मगोकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले होते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यासोबत ढवळीकर बंधूंच्या झालेल्या बैठकीत गोव्यातील भाजप-मगो या दोन पक्षांतील युतीसोबतच कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी वापरलेल्या खालच्या दर्जाच्या भाषेचा उल्लेख करण्यात आला. युतीतील अन्य पक्षाबाबत भाजपच्या मंत्र्याने असे वक्तव्य करणे कितपत योग्य? असा प्रश्न या बैठकीत चर्चेला आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या सर्व घडल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मगोची युती अभंग असल्याचे म्हटले होते. मात्र मगोने हा प्रकार गांभीर्याने घेत थेट भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आणि ढवळीकर बंधू पहाटेच दिल्लीत दाखल झाले. आज सायंकाळी उशिरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.