
सिनेनामा
‘स्पाॅटलाईट’ सिनेमहोत्सवात मिळाला ‘एक कप च्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :
येथील प्रसिद्ध लेखिका, संगीतकार आणि सिनेनिर्मात्या माधुरी अशिरगडे यांची कथा व सहनिर्मिती असलेल्या “एक कप च्या “या कोंकणी लघुपटाची निवड मुंबईतील स्पाॅटलाईट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी झाली. पनवेल येथे आयोजित या सिनेमहोत्सवात प्रदर्शित झालेल्या ‘एक कप च्या..!’ या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या लघुपटाचे पटकथा-संवाद व दिग्दर्शन किशोर अर्जुन यांचे असून या पूर्वी या लघुपटाची निवड इफ्फि मध्ये गोवन स्टोरीज विभागाचा ओपनिंग मुव्ही म्हणून निवड झाली होती. त्याचप्रमाणे वेव्ज आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात देखील एक कप च्या लघुपटाला उपस्थितीतांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.

दरम्यान, या लघुपटाचे पुणे व नागपूर येथे एकूण चार ठिकाणी लोकाग्रहास्तव प्रदर्शन झाले आहे. चित्रपट कोंकणी भाषेत असून याच्या कथेसाठी माधुरी अशिरगडे यांना विशेष सन्मान देखील झाला आहे.
बहुभाषिक अभिनेत्री रावी किशोर आणि अभिषेक आनंद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटाची सहनिर्मिती मनीषा अक्षय, विकास कासलीवाल व प्रा. नंदा पाटील यांनी केली आहे. तर, सुनंदा काळुस्कर या कार्यकारी निर्मात्या आहेत.