
‘विन्सन ग्राफिक्स’, महेश मांजरेकर यांच्या ‘बंडखोर’चा थाटात मुहूर्त
पणजी:
गोव्यातील प्रसिद्ध निर्मिती संस्था ‘विन्सन ग्राफिक्स’ने आपला नवा मराठी सिनेमा ‘बंडखोर’ची आज घोषित केली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उत्साहात सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. यावेळी सिनेमाचे निर्माते संजय शेट्ये, सिनेमाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा तथा आमदार डिलायला लोबो, सालीगावचे आमदार केदार नाईक यांच्यासह सिनेमातील कलाकार- तंत्रज्ञाची उपस्थित होती.
प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे ‘विन्सन’च्या ‘बंडखोर’ या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून, या निमित्ताने ते प्रथमच गोमंतकीय निर्मिती संस्थेच्या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. स्त्री सबलीकरणावर आधारित हा सिनेमा सामाजिक भान राखणारा आणि महिलांना स्व जाणिवेची, स्व कर्तृत्वाची ओळख करून देणारा ठरू शकेल, असे यावेळी निर्माते संजय शेट्ये यांनी सांगितले. या सिनेमाचे संपूर्ण चित्रण गोव्यातच होणार असून, या सिनेमात गोमंतकीय कलाकारांसह विविध तांत्रिक आणि कलात्मक विभागात मोठ्या प्रमाणात गोमंतकीय तंत्रज्ञ असल्याचेही शेट्ये यांनी नमूद केले.
या सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, विनय कामत, सिद्धार्थ बोडके, रावी किशोर यांच्यासमवेत मंदार जोग, नीती कामत, मोहन चांदेलकर, सिद्धी उपाध्ये, अभिषेक म्हाळशी, रोहित खांडेकर, प्रज्ञा राणे यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर दस्तुरखुद्द महेश मांजरेकर हेदेखील विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
समाजातील विविध स्तरांतील स्त्रियांच्या जगण्याचा वेध घेण्याचा या सिनेमातून घेण्यात येणार असून, यात त्यांचा संघर्ष, त्यांच्या आकांक्षा, त्यांची स्वप्ने आणि हे सगळे मिळवताना त्यांना पार करावे लागणारे अडथळे याकडे लक्ष वेधले आहे. हा सिनेमा फक्त स्त्रियांचे वास्तव दाखवण्यासाठीच नाही तर त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी करत असल्याचे, यावेळी महेश मांजरेकर यांनी आवर्जून सांगितले.
या सिनेमाचे निर्माते ‘विन्सन ग्राफिक्स प्रॉडक्शन’ यांचा प्रादेशिक सिनेसृष्टी आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये महत्वाचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांनी यापूर्वी ‘दिगंत’ हा कोंकणी तर ‘स्थल पुराण’ या मराठी सिनेमाची निर्मिती केली असून ‘बंडखोर’ हि त्यांची तिसरी निर्मिती आहे. त्याचप्रमाणे गेल्या १४ वर्षांपासून ते प्रसिद्ध ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करत आहेत.





