महाराष्ट्र

भाजपने रडीचा डाव खेळू नये; लोकशाहीची चिंता असेल तर गोकुळमध्ये… : राज ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्ष सत्तेत असूनही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचा उपरोधिक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलला बहुमत मिळवता आले नाही. त्यानंतर सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असेही त्यांनी सुनावले.


भाजप हा खालपासून वरपर्यंत सत्तेत असलेला पक्ष आहे. असे असतानाही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ त्यांच्यावर येते, हा विरोधाभास असल्याचे ठाकरे म्हणाले. जगात सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढण्याचे हे एकमेव उदाहरण असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ संचालक निवडून आले. निवडणूक बॅलेट पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने झाली होती. असे असताना भाजपला सत्ता मिळवता आली नाही म्हणून सरकारने पाच संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार का दिला, असा सवाल त्यांनी केला.


खरोखरच लोकशाहीची काळजी असती, तर भाजपने असा प्रकार केला नसता. गोकुळमध्ये सत्ता मिळवता आली नाही म्हणून तत्त्वे बाजूला ठेवायची आणि दुसरीकडे लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढायचे, ही भाजपची दुटप्पी भूमिका असल्याची टीका ठाकरे यांनी केली.



महाराष्ट्रात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ पडल्याचे दिसत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले झाले, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर दहशतवादापासून देश वाचवण्यासाठी मोर्चे काढायचे. देशाची अर्थव्यवस्था संकटात असल्याचे सांगत अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही मोर्चे काढायचे, असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.


भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे. कोणत्याही मार्गाने भाजपने मिळवलेले बहुमत विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे सहन केले. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली आहे, तर भाजपनेही ही परिस्थिती सहन करायला शिकले पाहिजे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!