
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातमध्ये घेण्यावर राज ठाकरे आक्रमक
मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीबाहेर, गुजरातमधील केवाडिया येथे आयोजित करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पुरस्कार सोहळ्याचे स्थळ बदलण्यामागील कारण काय, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राष्ट्रीय पुरस्कारांच्या राजधानी दिल्लीतील प्रदीर्घ परंपरेत बदल करण्याची गरज काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरस्कार सोहळा दिल्लीहून हलवायचाच होता तर तो मुंबईत का आणला नाही? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या राज्यात हा सोहळा का आयोजित केला नाही, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाच्या राज्यांपैकी एखाद्या राज्याची निवड का करण्यात आली नाही, असेही त्यांनी विचारले.
‘गुजरातच का?’ असा थेट प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी केंद्रातील नेतृत्वाच्या निर्णयांवरही निशाणा साधला. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम गुजरातमध्ये नेण्याच्या प्रवृत्तीचा संदर्भ देत त्यांनी, ‘‘देशाच्या आजवरच्या प्रगतीचा पाळणा गुजरातमध्ये हलवला जात आहे का?’’, असा सवाल केला. देशाची उभारणी ही कोणत्याही एका राज्याच्या योगदानातून झालेली नसून अनेक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
कलाकारांनी भूमिका घ्यावी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा मुद्दा केवळ केवाडिया किंवा अन्य शहराचा नसून, पुरस्कार सोहळ्याची दिल्लीतील दीर्घ परंपरा का मोडली जात आहे, हा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘‘कलाकारांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवायला हवा. सरकारच्या स्तुतीची गीते गाण्याची सवय लागल्यामुळे आजची वेळ आली आहे,’’ अशी टीकाही त्यांनी केली.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक धोरणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्याचे सत्ताधारी कलासक्त नसल्याचा आरोप करताना चित्रपटांचा वापर प्रचारासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली. मात्र, या आरोपांपेक्षा कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्वायत्त आणि राष्ट्रीय स्वरूपाच्या परंपरेबाबत भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘महाराष्ट्र आणि दक्षिणेने कणखर भूमिका घ्यावी’
महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांनी या निर्णयावर कणखर भूमिका घेतली नाही तर भविष्यात दख्खन प्रांताच्या अस्मितेवर परिणाम होईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. ‘‘आज भूमिका घेतली नाही तर उद्या वेळ निघून गेलेली असेल,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
गुजराती समाजालाही त्यांनी आवाहन केले आहे. भाषिक नेत्यांची सत्ता असल्याचा अभिमान बाळगून केंद्राच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करू नका, असे आवाहन करताना इतर राज्यांतील नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर आणि व्यावसायिकांवर झालेल्या अन्यायाचा हिशेब ठेवतील, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केवाडिया येथे करण्यामागील केंद्र सरकारचे अधिकृत कारण आणि या निर्णयामुळे पुरस्कारांच्या स्वरूपात किंवा प्रक्रियेत कोणताही बदल होणार आहे का, याबाबतची अधिकृत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे या निर्णयावरून महाराष्ट्रात तसेच चित्रपट क्षेत्रात नव्याने राजकीय आणि सांस्कृतिक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.




