
नोरा फतेहीविरोधात ३ कोटींचा मानहानीचा दावा; चार्टर्ड विमान कंपनी न्यायालयात
मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही हिने चार्टर्ड विमानाबाबत सोशल मीडियावर केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्यांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला व व्यवसायाला नुकसान झाल्याचा आरोप करत ‘ड्यून्स एव्हिएशन’ या चार्टर्ड विमान कंपनीने नोरा फतेहीविरोधात तीन कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. गांधीनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबई ते जयपूर प्रवासादरम्यान नोरा फतेही यांनी चार्टर्ड विमानातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी विमानाला कथितरीत्या ‘टॉय’ आणि ‘लेगो एरोप्लेन’ असे संबोधत त्याची खिल्ली उडवल्याचा कंपनीचा आरोप आहे.
बुकिंगमध्ये १५ ते २० टक्के घट झाल्याचा दावा
नोरा फतेही यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असल्याने त्यांच्या पोस्ट आणि व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि व्यवसायावर परिणाम झाला, असा दावा ‘ड्यून्स एव्हिएशन’ने न्यायालयात केला आहे.
या प्रकरणानंतर कंपनीच्या बुकिंगमध्ये १५ ते २० टक्क्यांची घट झाली, तसेच विमानसेवा रद्द होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली, असा दावा कंपनीने केला आहे.
विमानाच्या सुरक्षिततेबाबतच्या दाव्यांना कंपनीचा आक्षेप
नोरा फतेही यांनी विमानाच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या कथित वक्तव्यांवरही कंपनीने आक्षेप घेतला आहे. मुंबई-जयपूर मार्गावर वापरण्यात आलेले ‘सेसना साइटेशन सीजेटी२’ हे विमान आवश्यक सुरक्षा निकष पूर्ण करणारे असून, ते डीजीसीएच्या नियमांनुसार प्रमाणित आणि उड्डाणासाठी योग्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
विमानाचे संचालन आवश्यक परवानग्या आणि कायदेशीर नियमांचे पालन करूनच करण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कोणतीही तांत्रिक माहिती किंवा तथ्य पडताळून न पाहता नोरा फतेही यांनी विमानाबाबत वक्तव्य केल्याचा आरोप कंपनीने केला आहे.
पोस्ट हटवून माफी मागण्याची मागणी
‘ड्यून्स एव्हिएशन’ने न्यायालयाकडे नोरा फतेही यांच्या सोशल मीडिया खात्यांवरील संबंधित पोस्ट आणि व्हिडीओ हटविण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी सार्वजनिकरीत्या स्पष्टीकरण देऊन माफी मागावी आणि कंपनीला झालेल्या नुकसानीपोटी तीन कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ सप्टेंबर रोजी गांधीनगर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. अग्रवाल यांच्या न्यायालयात होणार आहे.





