शिक्षक दिनानिमित्त ‘ज्योत स्कूल’च्या शिक्षकांचा गौरव
मडगाव : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दैवज्ञ समाज, मडगाव यांच्या वतीने ज्योत विद्यालयातील शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दवरली, मडगाव येथील ऑटिझमग्रस्त मुलांसाठी कार्यरत असलेल्या ज्योत विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास दैवज्ञ समाज, मडगावचे अध्यक्ष रमाकांत रायकर, उपाध्यक्ष अतुल वेर्लेकर, शिक्षण विभागाचे अध्यक्ष तथा ज्योत विद्यालयाचे अध्यक्ष उपेंद्र मडकयकर, सचिव रोहित वेर्णेकर, ज्योत सोसायटीचे अध्यक्ष दुलबा सावंत तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा देसाई उपस्थित होते.
दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष रमाकांत रायकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. विशेष मुलांच्या जीवनात आशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक करीत असलेल्या अथक प्रयत्नांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ज्योत विद्यालयाचे अध्यक्ष उपेंद्र मडकयकर यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विशेष मुलांसोबत काम करण्यासाठी केवळ अध्यापनाचे कौशल्य पुरेसे नसून त्यांच्या गरजा आणि क्षमता समजून घेण्याची संवेदनशीलताही आवश्यक असते. प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने शिकते आणि या फरकांना समजून घेऊन त्यांचे सामर्थ्य संधी व विकासात रूपांतर करण्याचे कार्य ज्योत विद्यालयातील कर्मचारी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदावन रायकर यांनी केले. दैवज्ञ समाजाचे सचिव रोहित वेर्णेकर यांनी आभार मानले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांसह ज्योत विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे तसेच दैवज्ञ समाजाच्या शिक्षण विभागातील सदस्यांचे आभार व्यक्त केले.





