
‘ख्यास्त’च्या कन्नड अनुवादाचे ३१ रोजी प्रकाशन
पणजी :
साहित्य अकादेमी पुरस्कार विजेत्या लेखिका आणि सिनेकर्मी ज्योती कुंकळकर यांच्या ‘ख्यास्त’ या गाजलेल्या कोंकणी कादंबरीच्या कन्नड अनुवादाचे प्रकाशन ३१ मे रोजी पणजी, कंपाल येथील ध्याना सेंटर येथे संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
ज्योती कुंकळकर यांच्या दोन वर्षापूर्वी सहित प्रकाशनच्यावतीने प्रकाशित झालेल्या ‘ख्यास्त’ या कोंकणी कादंबरीने गोव्यात आणि गोव्याबाहेरदेखील चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कोंकणी आणि कन्नड लेखिका डॉ. गीता शेणॉय यांनी या कादंबरीचा कन्नड अनुवाद ‘दंडने’ नावाने प्रसिद्ध केला असून, या कन्नड पुस्तकाचे गोव्यात विशेष कार्यक्रमात प्रकाशन होणार आहे.
साहित्य अकादमी विजेत्या कोंकणी लोकसाहित्यिका डॉ. जयंती नायक यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, यावेळी साहित्य अभ्यासिका डॉ. सविता केरकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, तर प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. मनोज कामत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. विकासिनी मंडळ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, या प्रकाशन समारंभानिमित्ताने इतर भाषांतील कोंकणी साहित्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व भाषिक लेखक, वाचक आणि साहित्यप्रेमींनी सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.