गोवा

“आमकां नाका रेंट अ कार”; गोमंतकियांनी आता हा जीवघेणा धंदा थांबवला पाहिजे’

मडगाव: “बस्स आता पुरे झाले. भरधाव वेग, धोकादायक ओव्हरटेकिंग आणि “रेंट अ कार”वाहनांची बेजबाबदार वाहतूक गोव्याचे रस्ते मृत्यूचे सापळे बनवत आहे. निरपराध लोकांचे जीव जात असताना सरकार मात्र केवळ प्रेक्षक बनून बसले आहे,” असे मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी “आमकां नाका रेंट अ कार” ही जनजागृती मोहीम सुरू करताना म्हटले.

गोव्यात अलीकडे घडलेल्या अपघातांचा उल्लेख करत प्रभव नायक म्हणाले की, २६ मे रोजी दक्षिण गोव्यात एका बेदरकार रेंट अ कार वाहनाने निरपराध महिला दुचाकीस्वाराला धडक दिली होती, तर आज उत्तर गोव्यात झालेल्या आणखी एका भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक जखमी झाला आहे. “रेंट अ कार वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत युवकाच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना असून जखमी युवक तसेच महिला लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो,” असे ते म्हणाले.

प्रभव नायक यांनी सांगितले की, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सरकारकडे रेंट अ कार या जीवघेण्या समस्येवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. “दुर्दैवाची बाब म्हणजे सरकारने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी कार्यक्रम, उत्सव आणि प्रसिद्धीबाजीमध्येच स्वतःला गुंतवून ठेवले आहे, तर दुसरीकडे निरपराध गोमंतकीयांचे जीव जात आहेत. अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर सरकार जागे होणार?” असा सवाल त्यांनी केला.

जनतेने एकत्र येऊन आवाज उठवण्याचे आवाहन करत प्रभव नायक यांनी प्रत्येक गोमंतकीयाला “आमकां नाका रेंट अ कार” या घोषवाक्यासह छोटे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपले व्हिडिओ 7499358266 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे पाठवावेत, जेणेकरून बेदरकार रेंट अ कार व्यवस्थेविरोधातील लोकआंदोलन अधिक बळकट होईल आणि सरकारवर तातडीने कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण होईल.

“गोव्याचे रस्ते दिवसेंदिवस असुरक्षित होत असताना आपण शांत बसू शकत नाही. हा निरपराध लोकांचे जीव वाचवण्याचा प्रश्न आहे. आणखी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळण्यापूर्वी संपूर्ण गोव्याने एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. जनतेचा दबाव निर्माण करून सरकारला कारवाईस भाग पाडणे ही काळाची गरज आहे,” असे प्रभव नायक यांनी शेवटी म्हटले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!