
पणजी : योग दिन, चिखल कालो, सांजांव उत्सव आणि ‘सरकार तुमच्या दारी’ यांसारख्या सरकारी कार्यक्रमांच्या आयोजनात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केला आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर आणि प्रियोळचे माजी ब्लॉक अध्यक्ष हेमंत नाईक यावेळी उपस्थित होते.
पणजीकर म्हणाले, योग दिनानिमित्त सक्तीची उपस्थिती लावण्यास काँग्रेसने विरोध केला असता भाजपकडून योगाबाबत उपरोधिक टीका करण्यात आली होती. मात्र, योग ही सत्य, शिस्त आणि आत्मसंयम शिकवणारी जीवनपद्धती असताना, सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि पदाधिकारी असंसदीय भाषा वापरत असून भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
योग दिन कार्यक्रमाच्या खर्चाबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मिळालेल्या माहितीत अनेक विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला. या कार्यक्रमासाठी कोणताही अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला नव्हता, तसेच निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली नसल्याचे उत्तर सरकारने दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमावरील एकूण खर्च तसेच छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरणासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशीलही उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सांजांव उत्सवासाठी ९० लाख खर्चाचा दावा
सिओलिम येथे झालेल्या सांजांव उत्सवासाठी सरकारने सुमारे ९० लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला असला, तरी हा उत्सव स्थानिक ग्रामस्थ लोकसहभाग आणि देणग्यांच्या माध्यमातून आयोजित करतात. अशा परिस्थितीत सरकारी निधी नेमका कोणत्या बाबींवर खर्च करण्यात आला, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी पणजीकर यांनी केली.
चिखल कालो उत्सवावरही प्रश्नचिन्ह
माशेल येथील चिखल कालो उत्सवासाठी सरकारने सुमारे १.८० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा अंदाजित खर्च १.४९ कोटी रुपये असताना त्यापेक्षा अधिक खर्च कसा झाला, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे पणजीकर म्हणाले. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपव्यय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘सरकार तुमच्या दारी’वरही टीका
‘सरकार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम शासकीय उपक्रम नसून भाजपचा राजकीय प्रचार कार्यक्रम बनला असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारी निधीचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आल्याचा दावा पणजीकर यांनी केला.
सरकारने योग दिन, सांजांव उत्सव आणि चिखल कालो यांसह विविध कार्यक्रमांच्या खर्चाचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.







