गोवा

प्रियोळचे ओबीसी नेते नोनू नाईक काँग्रेसमध्ये

पणजी :
प्रियोळ मतदारसंघातील ओबीसी नेते आणि समाजसेवक नोनू नाईक यांनी बुधवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सदस्यत्व स्वीकारले. यावेळी प्रियोळ मतदारसंघातील संघटन बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली.


या वेळी चोडणकर यांनी राज्यातील विविध क्षेत्रांतील समाजसेवक, व्यावसायिक, युवक आणि तळागाळातील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचा दावा केला. भाजप सरकारने अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून, विधानसभा निवडणुकांमध्ये अनुसूचित जमाती समाजाला आरक्षण देण्याबाबतची आश्वासनेही पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजाला सरकारी नोकरीतील घटनात्मक प्रतिनिधित्व मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. अनुसूचित जमाती उपयोजनेतील निधी विकासकामांऐवजी अन्य कारणांसाठी वळविण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी नोनू नाईक यांच्या प्रवेशामुळे प्रियोळ मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजपच्या कारभारामुळे जनतेत नाराजी वाढत असून, काँग्रेस हा पर्याय म्हणून पुढे येत असल्याचा दावा त्यांनी केला.


काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर नोनू नाईक यांनी लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसची भूमिका आपल्याला भावल्याने पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. प्रियोळ मतदारसंघात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमास कार्याध्यक्ष ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा, जिल्हाध्यक्ष मंगलदास नाईक, गटाध्यक्ष गुरुदास कोरगावकर, सरचिटणीस प्रदीप नाईक, ओबीसी विभागाचे अध्यक्ष शरद चोपडेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष रामकृष्ण जल्मी तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!