
पंडित नेहरूंच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचा लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचा निर्धार
पणजी : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे पणजी येथील काँग्रेस मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा, गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एम. के. शेख आणि सुनील कवठणकर, माध्यम व संपर्क विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर तसेच युवक काँग्रेसचे अध्यक्ष आर्चित नाईक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत नेहरू यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. स्वतंत्र परराष्ट्र धोरण, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आणि लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे ठाकरे म्हणाले.
“आज मतचोरीच्या माध्यमातून नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत लोकशाही, निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे,” असे ठाकरे यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि प्रगतिशील भारताच्या संकल्पनेचा उल्लेख केला. वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिकीकरण, कृषी विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीचा पाया नेहरू यांनी घातल्याचे ते म्हणाले. त्यांच्या विचारांचे आजही महत्त्व असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले.
खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी अणुऊर्जा कार्यक्रम, अंतराळ संशोधन आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्ध आर्थिक विकासाला चालना देण्यातील नेहरू यांच्या भूमिकेचा उल्लेख केला. माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा यांनी कृषी विकास, सिंचन आणि औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी नेहरू यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एम. के. शेख यांनी आयआयटी आणि एम्ससारख्या संस्थांच्या उभारणीसह शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासातील नेहरू यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. भाक्रा नांगल आणि हिराकूड यांसारख्या धरण प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.
नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. लोकशाही संस्था, सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम व संपर्क विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केले. राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे अध्यक्ष प्रवीण ब्लागन यांनी आभार मानले.


