पणजी : ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी २०२६) निमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ईएसजी) गोवा सरकारच्या सहकार्याने तिसऱ्या आकाशकंदील निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत गोव्यातील सर्व रहिवाशांना सहभागी होता येणार आहे. आकाशकंदील तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणे बंधनकारक असून थर्माकोलचा वापर करण्यास मनाई आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी इफ्फीचा शुभंकर असलेल्या ‘मोर’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सहभागी स्पर्धकांना मोराच्या संकल्पनेवर आधारित आकाशकंदील तयार करावे लागतील.
स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून जास्तीत जास्त ६०० प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यातून ५० प्रवेशिकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. प्रवेशिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर स्वीकारल्या जातील. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रोत्साहनपर ५०० रुपये देण्यात येणार आहेत. नोंदणीची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
तयार केलेले आकाशकंदील २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ईएसजीच्या कार्यालयात जमा करावे लागतील. प्रदर्शनासाठी आवश्यक स्टँड, बल्ब आणि वीजजोडणीची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.
प्रत्येक तालुक्यातून तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल. प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. विजेत्यांना २७ नोव्हेंबर रोजी पारितोषिके प्रदान करण्यात येतील.
स्पर्धेच्या नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी नीलय नाईक (मो. ७३५००१९१४९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ईएसजीतर्फे करण्यात आले आहे.



