अर्थमत/ टेक्नॉलॉजी

एअर इंडियाची लंडनमध्ये ब्रिटनमधील पर्यटन व्यावसायिकांसोबत विशेष बैठक

लंडन : भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने एअर इंडियाने लंडनमध्ये ब्रिटनमधील प्रमुख पर्यटन व्यावसायिकांसोबत विशेष बैठकीचे आयोजन केले. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भारताला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक प्रभावीपणे प्रस्थापित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (डब्ल्यूटीएम) लंडनच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला ब्रिटनमधील पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढवणे, प्रमुख जागतिक बाजारपेठांमधील व्यवसायाच्या संधी शोधणे आणि भारतातील सांस्कृतिक, ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटनस्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार करणे, हे बैठकीचे प्रमुख विषय होते.

या बैठकीत साऊथॉल ट्रॅव्हल, ब्राइटसन ट्रॅव्हल, मोरेसँड, स्कायलॉर्ड ट्रॅव्हल्स, कार्लटन लेझर, टीयूआय, ट्रेलफाइंडर्स, कुओनी, एक्स्पेडिया, ट्रिप डॉट कॉम आणि अकबर ट्रॅव्हल्स यांसारख्या प्रमुख पर्यटन कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले. लंडन गॅटविक विमानतळाच्या प्रतिनिधींनीही बैठकीला उपस्थिती लावली. पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रातील भागीदारीच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यावर यावेळी भर देण्यात आला.

दरम्यान, भारताला जागतिक पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक तसेच ट्रान्झिट हब म्हणून देशाचे स्थान मजबूत करण्यासाठी एअर इंडिया आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार पर्यटन विपणन, भारतीय पर्यटनस्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार, पर्यटन व्यावसायिकांशी संवाद, ट्रान्झिट पर्यटन आणि पर्यटकांचा प्रवासानुभव सुधारण्यासाठी संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

एअर इंडियाच्या विस्तारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा नेटवर्कचा आणि पर्यटन मंत्रालयाच्या ‘इन्क्रेडिबल इंडिया’ या उपक्रमाचा या भागीदारीसाठी उपयोग केला जाणार आहे. भारतातील विविध पर्यटनस्थळांची जागतिक स्तरावर ओळख वाढवणे, अधिकाधिक परदेशी पर्यटकांना आकर्षित करणे आणि देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

या बैठकीच्या माध्यमातून एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रातील भागीदारांसोबत सहकार्य वाढवण्याची आणि भारताला जागतिक स्तरावरील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून प्रस्थापित करण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!