
IFFI 2026 : भारतीय पॅनोरमा विभागाच्या चित्रपट परीक्षण समितीच्या अध्यक्षपदी मधुर भांडारकर
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) भारतीय पॅनोरमा विभागातील फीचर फिल्म ज्युरीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागासाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांचे परीक्षण करून महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या २५ चित्रपटांची शिफारस करण्याची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखालील समितीवर असेल.
‘चांदनी बार’, ‘पेज ३’, ‘फॅशन’ आणि ‘बबली बाऊन्सर’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे भांडारकर हे सामाजिक विषयांवरील वास्तववादी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. ५७ व्या इफ्फीचे महोत्सव संचालक अशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे.
भारतीय पॅनोरमा विभागासाठी निवडण्यात येणाऱ्या २५ चित्रपटांमध्ये मुख्य प्रवाहातील पाच चित्रपटांचा समावेश असेल. या पाच चित्रपटांची शिफारस संबंधित चित्रपट व्यापार संघटनांकडून केली जाणार आहे. उर्वरित चित्रपटांची निवड ज्युरीच्या परीक्षणातून केली जाईल.
याशिवाय, ज्युरीकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील मुख्य स्पर्धेसाठी तीन चित्रपट, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट विभागासाठी दोन चित्रपट आणि आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी तीन चित्रपटांची शिफारस केली जाणार आहे. तसेच भारतीय फीचर फिल्ममधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी पाच चित्रपटांची शिफारस करून त्यातून विजेत्याची निवडही ज्युरी करणार आहे.
भारतीय पॅनोरमा हा इफ्फीच्या प्रमुख विभागांपैकी एक असून, देशातील समकालीन चित्रपटसृष्टीतील दर्जेदार आणि आशयघन चित्रपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांना या विभागात स्थान दिले जाते.
पात्र चित्रपटांचे प्राथमिक परीक्षण २९ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले होते. हे परीक्षण १६ ऑक्टोबरपर्यंत चालणार होते. त्यानंतर निवड झालेल्या ६० चित्रपटांचे केंद्रीय ज्युरीकडून मुंबईतील एनएफडीसीच्या चित्रपटगृहात १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान परीक्षण करण्यात आले.
५७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे.



