
‘अमन’ ठरला बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट
मुंबई/लंडन : लेखक-दिग्दर्शक राहुल रोये यांच्या ‘अमन’ या लघुपटाने ७०व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी २०२६च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) ‘शॉर्ट कट्स’ या स्पर्धात्मक विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर झाला होता. टोरंटोनंतर लंडनमध्ये मिळालेल्या या सन्मानामुळे ‘अमन’च्या आंतरराष्ट्रीय प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे.
चित्रपटाचे प्रभावी दिग्दर्शन, व्यक्तिरेखांची सूक्ष्म मांडणी आणि आत्मविश्वासपूर्ण कथनशैली यांची दखल घेत परीक्षकांनी या चित्रपटाला गौरविले. चित्रपटातील चित्रमय छायाचित्रण, कथानकाचा व्यापक आवाका आणि मध्यवर्ती विषयातील गुंतागुंत संवेदनशीलतेने हाताळण्याची पद्धत यांचेही परीक्षकांनी विशेष कौतुक केले.
हेलेन सिमन्स, लिओ राइश आणि जॅक केसी यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाने म्हटले, “ ‘अमन’च्या प्रभावी चित्रपटनिर्मितीने आम्ही प्रभावित झालो. गुंतागुंतीचे विषय हाताळतानाही चित्रपटाने अशा प्रामाणिक आणि सूक्ष्मपणे रेखाटलेल्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत, ज्यांच्या प्रवासात प्रेक्षक गुंतून जातात. चित्रपटातील चित्रमय छायाचित्रण आणि व्यापक, आत्मविश्वासपूर्ण कथनशैलीने आम्हाला त्या जगात संवेदनशीलतेने प्रवेश दिला. कथानकातील गुंतागुंतीला सोपी उत्तरे देण्याचे टाळल्यामुळे चित्रपट अधिक परिणामकारक ठरतो.”
दिग्दर्शक राहुल रोये यांच्यासाठी हा पुरस्कार केवळ चित्रपटाच्या यशापुरता मर्यादित नाही. जगभरातील ट्रान्स समुदायांना आजही भेदभाव, राजकीय विरोध आणि हक्क व सामाजिक दृश्यतेसाठीच्या संघर्षाला सामोरे जावे लागत असताना या सन्मानाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पुरस्काराबद्दल बोलताना राहुल रोये म्हणाले, “७०व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळणे हा अत्यंत भावनिक आणि आनंददायी अनुभव आहे. जगभरात ट्रान्स व्यक्तींचे अस्तित्व राजकीय पातळीवर नाकारले जात असताना, त्यांच्या आयुष्यावर बंधने आणणारे कायदे केले जात असताना आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटले जात असताना हा पुरस्कार विशेष अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा वाटतो.”
चित्रपटाचे निर्माते नीरज चुरी यांनीही या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अमन’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. ओळख, पुरुषत्व आणि पालकत्व यांविषयीच्या आपल्या रूढ समजुतींना प्रश्न विचारणारा हा धाडसी आणि मनाला भिडणारा चित्रपट आहे. त्याच वेळी तो एक अत्यंत मानवी कथा सांगतो.
“या सन्मानाचे विशेष महत्त्व असे की, परीक्षकांनी केवळ चित्रपटाच्या कथेला नव्हे, तर राहुल रोये यांनी ती ज्या संवेदनशीलतेने, सूक्ष्मतेने आणि सिनेमॅटिक दृष्टिकोनातून पडद्यावर साकारली आहे, त्यालाही गौरविले आहे.
“टीआयएफएफमधील जागतिक प्रीमिअरनंतर बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेला हा पुरस्कार दाखवून देतो की, प्रामाणिक क्विअर आणि ट्रान्स कथनशैलीला भौगोलिक सीमा ओलांडून प्रेक्षकांशी जोडण्याची ताकद आहे.”
‘अमन’ची कथा एका ट्रान्स पुरुषाभोवती फिरते. लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी आपण गर्भवती असल्याचे त्याला समजते. या अनपेक्षित घटनेमुळे त्याच्या स्वतःच्या ओळखीविषयी, पुरुषत्वाविषयी, पितृत्वाविषयी आणि स्वतःच्या शरीराशी असलेल्या नात्याविषयी खोल आत्मपरीक्षण सुरू होते. कबीर मान आणि सिरत तनेजा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटात ट्रान्स व्यक्तिरेखांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून लिंगभाव आणि पालकत्वाविषयीच्या प्रस्थापित कल्पनांना आव्हान दिले आहे.
ब्रिटन, अमेरिका, भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त निर्मितीतून साकारलेल्या या चित्रपटामागे प्रतिनिधित्वाचा विस्तार करणाऱ्या आणि रूढ कथनपद्धतींना आव्हान देणाऱ्या कथा सांगण्याची बांधिलकी असलेली आंतरराष्ट्रीय चित्रपटकर्मींची टीम आहे. एले लिऑन नॉस्टास, अपूर्वा बक्षी, नीरज चुरी, तुषार त्यागी आणि आबिद अझीझ मर्चंट हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर डॉमिनिक वेलिन्स्की, निखिल अडवाणी आणि स्टीफन हार्मटी यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.
टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील जागतिक प्रीमिअर आणि आता बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोच्च सन्मान यांमुळे ‘अमन’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. संवेदनशील विषयाची हाताळणी, प्रभावी चित्रभाषा आणि मानवी नात्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यांमुळे या लघुपटाची दखल घेतली जात आहे.





