गोव्यामध्ये उद्या, 20 नोव्हेंबर , 2022 रोजी सुरु होत असलेल्या 53 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आलेले पाहुणे आणि प्रतिनिधींचे माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल मुरुगन यांनी स्वागत केले आहे.
इफ्फी महोत्सवासाठी दर वर्षी येणाऱ्या प्रवेशिकांची गुणवत्ता आणि संख्या सातत्त्याने वाढत आहे ,याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुरुगन म्हणाले की “यंदाच्या वर्षी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विभागांमधील प्रवेशिकांची विक्रमी संख्या महोत्सवाची जागतिक स्तरावरील वाढती लोकप्रियता दर्शवत आहे.”
त्यांनी सध्याच्या आणि उदयोन्मुख चित्रपट प्रेमींसाठी माहिती दिली की, इफ्फीने सर्व प्रकारच्या शैली, संकल्पना आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे आकर्षक पॅकेज तयार केले आहे. “महोत्सवात मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचे शैक्षणिक पॅकेज देखील सादर केले जाईल.”
इफ्फी-53, सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .