
पणजी :
कर्नाटक काँग्रेस सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कळसा भंडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन कळसा भंडुरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेण्याची मागणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेळ देत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
कर्नाटक सरकारच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कळसा भंडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी मागे घेण्यास आलेल्या अपयशाबद्दल फटकारले.
म्हादई प्रश्नावर गोव्याचे हित जपण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात गोवा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने आमची जीवनदायीनी आई म्हादईचा सौदा केला, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.