गोवा

भारतीय जादू पार्टीचा चीफ मॅजीशीयन  २०,००० नोकऱ्या निर्माण करणार : प्रभव नायक

मडगाव: गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न अखेर सुटल्याचे दिसत आहे. उद्योग, गुंतवणूक, किंवा ठोस धोरणांमुळे नव्हे, तर निव्वळ जादूमुळे! गोव्याचा चीफ मॅजीशीयन आता आपल्या टोपीतून थेट “२०,००० नोकऱ्या” बाहेर काढणार आहे, अशी उपरोधिक टीका मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.


आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना “जादूगार” संबोधत सहा महिन्यांत २०,००० नोकऱ्या देण्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभव नायक यांनी हा टोला लगावला. रोजगारनिर्मिती हा आता प्रत्यक्ष कृतीचा विषय राहिला नसून केवळ जादूचा खेळ झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


प्रभव नायक म्हणाले की, गोवा अजूनही राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत उच्च बेरोजगारी दर असलेल्या राज्यांमध्ये गणला जातो. हजारो सुशिक्षित युवक-युवती रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सरकारकडून केवळ मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र त्या पूर्ण करण्यासाठी कोणताही स्पष्ट आराखडा दिसत नाही.


कर्मचारी निवड आयोगाला बगल देत विविध सरकारी विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. तसेच कथित ‘कॅश फॉर जॉब्स’ घोटाळ्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला असून, रोजगार शोधणाऱ्या युवकांच्या प्रश्नांची उत्तरे सरकारने अद्याप दिलेली नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.


“सरकारने खरोखरच सहा महिन्यांत २०,००० नोकऱ्या निर्माण केल्या तर गोव्यातील जनता त्याचे मनापासून स्वागत करेल. मात्र रोजगारनिर्मिती ही घोषणा, प्रसिद्धीबाजी किंवा जादुई दाव्यांमधून होत नसते. गोव्याच्या युवकांना पारदर्शक भरती प्रक्रिया, जबाबदार प्रशासन, कौशल्याधारित संधी आणि खऱ्या अर्थाने रोजगारनिर्मिती हवी आहे; राजकीय भ्रमजाल आणि निवडणूकपूर्व आश्वासने नव्हेत,” असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!