गोवा

मुख्यमंत्री पंतप्रधानांना “भिवपाची गरज ना!” सांगण्याचे धाडस दाखवतील का? – प्रभव नायक

मडगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आर्थिक शिस्तीचा पुरस्कार करतात आणि “खाओ, पिओ, मौज करो” या संस्कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकार सार्वजनिक पैशांची उधळपट्टी, भव्य समारंभ, आलिशान कार्यक्रम आणि संशयास्पद खर्चासाठी ओळखले जाते. पंतप्रधानांना “भिवपाची गरज ना!” असे सांगण्याचे धाडस गोव्याचे मुख्यमंत्री दाखवतील का, असा सवाल मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केला.

गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ देत प्रभव नायक यांनी गोवा सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांवर टीका केली. आर्थिक शिस्तीची सुरुवात स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

पाच वर्षांत विविध कार्यक्रमांवर जवळपास ७०० कोटी रुपये खर्च करण्याचे सरकार कसे समर्थन करू शकते, असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे आवश्यक असलेले पूर्ण क्षमतेच्या टर्शयरी इस्पितळात रूपांतर अद्याप झालेले नाही. नागरिकांना आजही आवश्यक आरोग्य सुविधा आणि पुरेशा वैद्यकीय पायाभूत सुविधांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

स्थानिक चित्रपट निर्माते आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, खेळाडूंना त्यांची बक्षिसाची रक्कम वेळेवर मिळत नाही आणि सामाजिक कल्याणकारी योजनांचे लाभार्थी आर्थिक मदतीसाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, दुसरीकडे इफ्फी आणि भव्य सोहळ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचेही प्रभव नायक यांनी निदर्शनास आणून दिले.

सार्वजनिक खर्चात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी प्रभव नायक यांनी केली. पंतप्रधानांकडून आर्थिक शिस्तीचे उपदेश दिले जात असताना गोव्यातील त्यांच्याच भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. जनतेचा पैसा हा नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना दिलेली आश्वासने पाळण्यासाठी वापरला गेला पाहिजे, दिखाऊ खर्चासाठी नव्हे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!