गोवादेश/जग

वेलंकणी येथे ‘गोवा हाऊस’साठी जागेचा प्रस्ताव

गिरीश चोडणकरांची तामिळनाडूच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांशी भेट

पणजी : वेलंकणी येथे गोव्यातून जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ‘गोवा हाऊस’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तामिळनाडूचे सार्वजनिक बांधकाम व क्रीडा विकासमंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली. या भेटीत प्रस्तावित गोवा हाऊससाठी वेलंकणी येथे योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

ख्रिश्चन असोसिएशन ऑफ गोवा (CAG) यांच्याकडून यापूर्वी सादर करण्यात आलेला गोवा हाऊसचा सविस्तर प्रस्तावही चोडणकर यांनी मंत्र्यांकडे सुपूर्द केला. वेलंकणी येथे दरवर्षी मोठ्या संख्येने गोव्यातील भाविक भेट देतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवास करणारी कुटुंबे तसेच सर्वसामान्य भाविकांना या प्रस्तावित सुविधेचा लाभ होऊ शकतो, असे चोडणकर यांनी सांगितले.

प्रस्तावित गोवा हाऊसमध्ये निवासाची व्यवस्था, मूलभूत सुविधा, माहिती तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यामुळे गोव्यातून वेलंकणीला जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सुविधा मिळू शकेल, असा दावा चोडणकर यांनी केला.

यापूर्वी हा प्रस्ताव तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोरही मांडण्यात आला होता. त्यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार चोडणकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री आधव अर्जुन यांची भेट घेतली.

girish Chodankar Meets Tamil Nadu PWD Minister to Pursue Goa House at Velankanni

“गोवा हाऊस म्हणजे केवळ इमारत उभारण्याचा विषय नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास करून वेलंकणीला येणाऱ्या गोमंतकीयांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह सुविधा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, कुटुंबे आणि सर्वसामान्य भाविकांना त्याचा फायदा होईल,” असे चोडणकर यांनी सांगितले.

तामिळनाडूच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेत, प्रकरणावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे चोडणकर यांनी सांगितले. प्रस्तावाला मंजुरी मिळेपर्यंत तामिळनाडू सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!