फोंडा :
कृषी आणि उद्योग क्षेत्रामुळे आपल्या देशाची प्रगती होत आहे, पण तरीसुद्धा नागरी सेवेकडे आज मुलांचा कल राहिला आहे. गोव्यात नागरी सेवेत जाण्यासाठी गोमंतकीय युवकांकडून अनिच्छा व्यक्त केली जायची, पण आता परिस्थिती सुधारली असल्याने नागरी सेवेच्या माध्यमातून जे काही चांगले आहे ते देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आपण जो निर्णय देऊ तो समाजासाठी घातक नव्हे तर समाजासाठी सुधारक बनला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी केले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात नुकत्याच झालेल्या परिक्रमा नोलेज टर्मिनसतर्फे सहाव्या गोवा अँकॅडमिक फोरम ”करियर ॲट क्रॉसरोडस्’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर परिक्रमा नोलेजचे अध्यक्ष युगांक नाईक, तसेच प्रा. अजीत परुळेकर व प्रा. अनुराधा वाकळे आदी उपस्थित होत्या. यावेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
आपल्याला उच्च ध्येय प्राप्त करायचे असल्यास लहानपणापासून त्यासंबंधीची स्वप्ने पहा आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी खडतर मेहनत करा, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या भविष्याची वाटचाल आधीच निश्चित करावी आणि त्यादृष्टीने वाटचाल करावी असे आवाहन यावेळी अलोक कुमार यांनी यावेळी केले.
यावेळी प्रसिद्ध गोमंतकीय अभिनेता रोहित खांडेकर यांनी घेतलेल्या ‘आईस ब्रेकिंग’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युगांक नाईक यांनी केले तर शलाका देसाई आणि उर्वशी नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी झालेल्या विविध सत्रात विविध विषयांवर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.