पणजी :
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी, १२ जुलै २०२४ रोजी गोवा भेटीदरम्यान काँग्रेस शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ देण्याची मागणी करणारा ईमेल पाठवला आहे.
वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देवून अमित पाटकरांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना १२ जुलै २०२४ रोजी गोवा भेटीच्या वेळी, कॉंग्रेस पक्षाचे आमदार तसेच दक्षिण गोवा खासदार आणि इतर पदाधिकारी यांच्यासमवेत विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे. गोवा आणि गोमंतकीयांना सतावणाऱ्या केंद्रिय मंत्री नितीन गडकरींच्या अखत्यारीतील अनेक समस्या मांडून चर्चा करण्यासाठी अमित पाटकरांनी वेळ देण्याचे त्यांच्या पत्रात लिहिले आहे.
गोव्यातील रस्ते विशेषत: राष्ट्रीय महामार्ग हे “मृत्यूचे सापळे” बनले असून सदर रस्त्यांवर दररोज जवळपास एक जीव जातो. महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामुळे रस्ते खड्डे, दरडी कोसळणे आणि जीवघेणे अपघात सुरू आहेत, असे अमित पाटकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
पत्रादेवी – पर्वरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे तसेच कामांचा दर्जा राखण्यासाठी तसेच प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्याकडे कंत्राटदाराच्या पूर्ण दुर्लक्ष हे लोकांच्या रोषाचे प्रमुख कारण बनले आहे. गोवा राज्यात सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणाच्या कामांबद्दल लोकांमध्ये चीड आहे असे अमित पाटकर यांनी पत्रात लिहीले आहे.
काँग्रेसने पत्रादेवी ते पर्वरी महामार्ग विस्तारीकरणाचे काम, पर्वरी ते पणजी उड्डाणपुलाचे बांधकाम, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात प्रवेश घेताना येणारे अडथळे, भोमा गावातून जाणारा ऑल्ड गोवा ते उसगाव महामार्गाचा विस्तार, नुवें ते नावेली राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम, नावेली ते कुंकळ्ळी महामार्ग यासारख्या रस्त्यांची व महामार्गांची यादी पत्रात देण्यात आली आहे. तसेच कुंकळ्ळी बायपास, कुंकळ्ळी ते काणकोण महामार्गाचे विस्तारीकरण, मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून कोळसा वाहतूक, झुआरी पुलाच्या मधोमध टॉवर बांधणे, बोरी पुलाचे बांधकाम, बोरी गावातून जाणारा महामार्ग विस्तारीकरण याकडे पत्राद्वारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरींचे लक्ष वेधण्यात आले आहे.
आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेस पक्षाची विनंती मान्य करतात का आणि गोवा दौऱ्यात शिष्टमंडळाची भेट घेतात का, हे पाहायचे आहे.