
…किमान ‘गोव्याच्या जावयांचा’ सल्ला तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकावा : युरी
पणजी :
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या वहन क्षमतेचा अभ्यास करण्याची आणि पश्चिम घाटाचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केलेल्या वक्तव्याचे स्वागत आहे. मला आशा आहे की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याची काळजी घेण्याचे गोव्याचे जावई सुरेश प्रभू यांचे शहाणपणाचे शब्द ऐकतील आणि पुढील नुकसान थांबविण्यासाठी कृतीशील पावले उचलतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गोवा राज्याच्या एकंदर भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्याची तसेच गोव्याला दिल्लीचा विस्तारीत प्रदेश होण्यावाचून रोखण्यासाठी पाऊले उचलण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, गेल्या बारा वर्षांपासून काँग्रेस जी मागणी करत आहे, तेच आता सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे.
थ्री लीनियर प्रोजेक्ट, तमनार पॉवर प्रोजेक्टच्या बाजूने बोलणाऱ्या आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमीन रूपांतरण आणि जमिनींच्या विक्रीला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे डोळे सुरेश प्रभू यांनी उघडले आहेत. म्हादई वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूनी सत्य बोलून भाजप सरकारला आरसा दाखवला, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या गोवा व्हिजन 2035 अहवालाची अंमलबजावणी करुन तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा सल्ला घेवून गोव्याचे पूढे अधिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कृतीशील पावले उचलावीत. या छोट्याशा राज्याला विध्वंसापासून वाचवीणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोव्याचे नुकसान करणाऱ्या संवेदनशील मुद्द्यांवर भाजप सरकारच्या सुस्त आणि बेफिकीर दृष्टिकोनामुळे मला वेदना होत आहेत. पर्यावरण, वन, वन्यजीव आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सरकार कोणतीही पावले उचलत नाही. गोवा सरकार जमीन आणि रिअल इस्टेट माफियांच्या नियंत्रणाखाली वागत आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
जर आपण पश्चिम घाटासारख्या जैव-विविधतेने समृद्ध प्रदेशाचे आताच संरक्षण केले नाही, तर आपल्याला एक दिवस दूधसागर धबधब्यातून पाण्याचा एक थेंबही खाली पडलेला दिसणार नाही. आमची जीवनदायीनी आई म्हादई कोरडी होऊन गोव्याचे वाळवंटात रुपांतर करेल. आपल्या राज्यापूढे असलेला धोका लक्षात घेवून आताच पाऊले उचलली नाहीत तर भयंकर संकटाला आम्हाला सामोरे जावे लागेल, असे युरी आलेमाव म्हणाले.