सिनेनामा 

“लोकनायक”चा १४ रोजी डिजिटल प्रीमियर

मडगाव: माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उद्योगमंत्री अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा, जनसेवेचा आणि चिरंतन वारशाचा वेध घेणाऱ्या “लोकनायक” या माहितीपटाचा डिजिटल मीडिया प्रीमियर सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता होणार असल्याची माहिती अनंत (बाबू) नरसिंह नायक जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. धेंपे यांनी दिली. या डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातून बाबू नायक यांचे जीवनकार्य आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.


धेंपे यांनी सांगितले की, अनंत (बाबू) नरसिंह नायक जन्मशताब्दी सोहळा समिती निर्मित “लोकनायक” या माहितीपटात बाबू नायक यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेण्यात आला असून, गोव्याच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण कालखंडाला आकार देण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण करण्यात आले आहे. त्यांचे जीवन ज्या प्रामाणिकपणा, साधेपणा, तत्त्वनिष्ठ राजकारण आणि निःस्वार्थ जनसेवेने परिपूर्ण होते, त्याचे प्रभावी दर्शन या माहितीपटातून घडते.


लोकनायक माहितीपटाला परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत. या माहितीपटात विजयादेवी प्रतापसिंह राणे, न्यायमूर्ती (निवृत्त) फर्दिनो रिबेलो, निर्मला सावंत, अॅड. रमाकांत खलप, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आत्माराम नाडकर्णी, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव आणि फ्रान्सिस्को सार्दिन, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, कुंकळ्ळीचे माजी आमदार मानू फर्नांडिस, अनिल खंवटे, एम. के. शेख, शिवानंद साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार राजू नायक, कलाकार साईश पाणंदिकर, श्रीनिवास धेंपे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मुलाखती आणि आठवणींचा समावेश आहे. त्यांनी बाबू नायक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, नेतृत्वाचे आणि वारशाचे विविध पैलू उलगडले आहेत.


धेंपे यांनी पुढे सांगितले की, “लोकनायक” माहितीपटाचे प्रकाशन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते १९ ऑगस्ट २०२६ रोजी बाबू नायक यांच्या वर्षभर चालणाऱ्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले. माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन किशोर अर्जुन यांनी केले असून, जन्मशताब्दी सोहळा समितीचे निमंत्रक विशाल पै काकोडे हे यांची माहितीपटाची संकल्पना असून तेच कार्यकारी निर्माते आहेत, अशी माहिती श्रीनिवास धेंपे यांनी दिली.

डिजिटल मीडिया प्रीमियर हा बाबू नायक यांचा वारसा भौगोलिक सीमांच्या पलीकडे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे धेंपे यांनी सांगितले. “लोकनायक”च्या माध्यमातून विशेषतः तरुण पिढीसह जगभरातील अधिकाधिक लोकांना बाबू नायक यांची सार्वजनिक जीवनाला आकार देणारी तत्त्वे, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि गोव्याप्रती असलेली त्यांची निष्ठा समजून घेता येईल, असा विश्वास, श्रीनिवास धेंपे यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!