K Viswanath: प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे निधन
के विश्वनाथ यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना दादा साहेब फाळके, पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तेलुगू चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कलातपस्वी के. विश्वनाथ यांचे गुरुवारी निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१६ साली त्यांना ‘दादा साहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता त्यांच्या निधनानंतर तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून के विश्वनाथ हे गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. के विश्वनाथ हे इंडस्ट्रीमध्ये तपस्वी म्हणून ओळखले जायचे.
के विश्वनाथ यांच्या करिअरची सुरुवात १९६५ साली. त्यांचा गोवरम हा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी शंकरभरणम, स्वाथिनुथ्थम, सागर संगमन आणि स्वयंकृषी के बिना अधूरी असे अनेक चित्रपट केले. त्यांच्या २०१०मध्ये प्रदर्शित झालेला ‘सुभाप्रदम’ हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. के विश्वनाथ यांना १९९२ मध्ये पद्मश्री किताब, तब्बल वीस वेळा आंध्र प्रदेश सरकारचा नंदी पुरस्कार, पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. सामाजिक विषयांवरील त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते.