सिनेनामा 

धनुष आणि मम्मुट्टी प्रथमच एकत्र

चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते धनुष आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मम्मुट्टी हे ‘ओम : चॅप्टर १ – उधिरम : द ब्लड वुड’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटात धनुष आणि मम्मुट्टी यांच्यासह साई पल्लवी, श्रीलीला, नसीरुद्दीन शाह आणि इंद्रन्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. साई अभ्यंकर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील दोन महत्त्वाच्या अभिनेत्यांना एकाच चित्रपटात पाहण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे.


आरटेक स्टुडिओजच्या संस्थापक श्रद्धा अग्रवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. धनुष आणि अझमत जगमग हेही निर्माते आहेत. श्रेयस श्रीनिवासन आणि संदेश अग्रवाल सहनिर्माते, तर विष्णू रामास्वामी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत. आरटेक स्टुडिओज प्रस्तुत आणि वंडरबार फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या माध्यमातून विविध भाषांमधील कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


“विविध चित्रपटसृष्टी, कलाकार आणि प्रेक्षक यांना एका मोठ्या व्यासपीठावर आणणारे चित्रपट निर्माण करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. धनुष आणि मम्मुट्टी यांना ‘ओम : चॅप्टर १’च्या निमित्ताने एकत्र आणणे हा आमच्यासाठी विशेष क्षण आहे. दोघांचाही अभिनयाचा वारसा मोठा आहे. या दोघांना एकाच पडद्यावर आणण्याचा अनुभव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,” असे निर्मात्या श्रद्धा अग्रवाल यांनी सांगितले.


मोठी कलाकारांची फळी आणि विविध भाषांतील चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा सहभाग यामुळे ‘ओम : चॅप्टर १’ या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!