सिनेनामा 

IFFI 2026 : ‘दुसऱ्यांच्या मापदंडांनुसार परिपूर्ण का व्हायचे?’: गिरीश कासारवल्ली

 सामाजिक विषमता आणि उपेक्षितांच्या जगण्याचे चित्रण हेच आपल्या सिनेमाचे केंद्र असल्याचे प्रतिपादन

पणजी : चित्रपट परिपूर्ण असण्यापेक्षा तो आपल्या समाजाच्या वास्तवाशी प्रामाणिक असणे अधिक महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांनी ठरवलेल्या मापदंडांनुसार आपण परिपूर्ण का व्हायचे? आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वास्तवाशी प्रामाणिक राहूनच चित्रपट निर्मिती केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि चौदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केले.

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित ‘द मोरल युनिव्हर्स ऑफ पॅरलल सिनेमा : ५० इयर्स ऑफ गिरीश कासारवल्ली’ या विशेष संवाद सत्रात ते बोलत होते. कला अकादमी येथे झालेल्या या चर्चेत त्यांनी आपल्या पाच दशकांच्या चित्रपट प्रवासाचा आढावा घेतला. चित्रपटांमधील सामाजिक विषमता, जातीय उतरंड, धार्मिक वर्चस्व आणि दुर्लक्षित समुदायांचे जगणे हे आपल्या कथांच्या केंद्रस्थानी राहिल्याचे त्यांनी सांगितले.

‘मनोरंजनही वैचारिक भूमिका मांडते’

१९७७ मध्ये ‘घटश्राद्ध’ या चित्रपटाद्वारे सुरू झालेल्या प्रवासापासून ‘तबराना कथे’, ‘थायी साहेबा’ आणि ‘द्वीपा’ यांसारख्या चित्रपटांपर्यंतच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट अशी विभागणी करण्याच्या प्रचलित दृष्टिकोनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

‘केवळ मनोरंजन नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. मनोरंजन हेदेखील एक वैचारिक स्वरूप आहे,’ असे ते म्हणाले. प्रत्येक चित्रपटातून काही ना काही विचार व्यक्त होत असतो. त्यामुळे चित्रपट निर्माते नकळत एखाद्या प्रस्थापित सामाजिक विचारसरणीला पाठिंबा देतात किंवा तिला आव्हान देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

Why Should I Be Perfect by Someone Else’s Standards?”: Girish Kasaravalli Champions Cultural Authenticity at IFFI 57

कथानकापेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा

नव्या कन्नड चित्रपट चळवळीविषयी बोलताना त्यांनी भारतीय समाज आणि संस्कृतीच्या वास्तवातून स्वतःची स्वतंत्र चित्रपटभाषा विकसित करण्याची गरज व्यक्त केली. इतर देशांच्या चित्रपटशैलींचे अनुकरण करण्याऐवजी आपल्या सामाजिक परिस्थितीतून चित्रपटाची शैली विकसित व्हायला हवी, असे ते म्हणाले.

‘चित्रपटाची शैली बाहेरून लादली जात नाही; ती आशयातूनच आकाराला येते. कथानकापेक्षा कथा सांगण्यामागचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असतो,’ असे त्यांनी नमूद केले.

प्रेक्षकांनी स्वतः विचार करावा

चित्रपटातून थेट नैतिक निष्कर्ष देण्याच्या पद्धतीला कासारवल्ली यांनी विरोध दर्शविला. काय योग्य आणि काय अयोग्य, याचा अंतिम निर्णय प्रेक्षकांवर सोडला पाहिजे. चित्रपटाने प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करावे, त्यांच्यावर निष्कर्ष लादू नयेत, असे त्यांनी सांगितले.

लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांच्या विचारांचा संदर्भ देताना प्रत्येक उत्तराच्या शेवटी एक ‘पण’ असायला हवे, असे त्यांनी नमूद केले. मानवी जीवनातील गुंतागुंत समजून घेण्यासाठी सरळसोट निष्कर्षांपेक्षा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘द्वीपा’ चित्रपटातील नागी या स्त्री व्यक्तिरेखेचा उल्लेख करताना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची स्त्रियांची क्षमता अधोरेखित केली. बदलत्या परिस्थितीतही वर्तमानातील आनंद शोधण्याची तिची वृत्ती महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चित्रपट हा अनुभव असतो, केवळ विधान नव्हे’

आपल्या चित्रपटनिर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना कासारवल्ली यांनी स्टोरीबोर्डपेक्षा तपशीलवार पटकथेवर अधिक भर देत असल्याचे सांगितले. दिग्दर्शकाच्या मनात चित्रपटाचा जन्म होत असला, तरी प्रत्यक्ष पडद्यावर तो साकारण्यासाठी संपूर्ण सहकाऱ्यांच्या योगदानाची आवश्यकता असते, असे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाने केवळ एखादे विधान मांडण्यापेक्षा प्रेक्षकांना एक अनुभव देणे महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी भारतीय चित्रपट निर्मात्यांना आपल्या सांस्कृतिक मुळांशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले.

या संवादाचे सूत्रसंचालन चित्रपट समीक्षक, पत्रकार आणि लेखक नमन रामचंद्रन यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!