IFFI 2026 : भारतीय चित्रपटांना स्पेनची साथ; सहनिर्मितीचे नवे दरवाजे उघडणार
पणजी : भारतीय आणि स्पॅनिश चित्रपटसृष्टीतील सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने भारत आणि स्पेन यांच्यातील दृकश्राव्य सहनिर्मिती करार अद्ययावत करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये यासंदर्भात चर्चा झाली.
स्पेन यंदाच्या इफ्फीमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून सहभागी झाला आहे. या निमित्ताने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव (प्रसारण) पृथुल कुमार यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि इंडिया सिने हबच्या (आयसीएच) प्रतिनिधींसह स्पेनच्या शिष्टमंडळाशी बैठक घेतली. स्पेनच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्पॅनिश इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी अँड ऑडिओव्हिज्युअल आर्ट्सच्या (आयसीएए) महासंचालक मार्ता सेरानो यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
भारत आणि स्पेन यांच्यातील विद्यमान दृकश्राव्य सहनिर्मिती करार २०१२ मध्ये करण्यात आला होता. या करारात सुधारणा करून दोन्ही देशांतील चित्रपट आणि दृकश्राव्य निर्मिती क्षेत्रातील सहकार्य अधिक सुलभ आणि व्यापक करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. स्पेनच्या बाजूने मांडण्यात आलेल्या प्रस्तावित चौकटीमध्ये कथापट, अॅनिमेशनपट, माहितीपट, दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट यांच्या सहनिर्मितीचा समावेश आहे.
स्पेनचा इफ्फीमधील सहभाग हा केवळ स्पॅनिश चित्रपटांचे प्रदर्शन करण्यापुरता मर्यादित नसून, दोन्ही देशांतील चित्रपट व्यावसायिकांमध्ये संवाद आणि सहकार्य वाढविण्याची संधीही ठरत आहे. समकालीन स्पॅनिश चित्रपटसृष्टीची ओळख भारतीय प्रेक्षकांना करून देण्याबरोबरच निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांना परस्पर सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा या सहभागाचा उद्देश आहे.
याशिवाय, २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान पणजी येथे आयोजित करण्यात आलेला २० वा वेव्ह्ज फिल्म बाजार हा भारत आणि स्पेनमधील चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांच्या संवादासाठी महत्त्वाचा मंच ठरणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी विशेष ‘स्पॅनिश डे’ आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये चित्रपट उद्योगाशी संबंधित चर्चासत्र आणि दोन्ही देशांतील व्यावसायिकांना परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या चर्चेमुळे भारत आणि स्पेन यांच्यात चित्रपट सहनिर्मिती, सर्जनशील भागीदारी आणि व्यावसायिक देवाणघेवाण वाढण्याच्या दृष्टीने नवे मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे.







