‘लापता लेडीज’ सोबत आमिरचा अनोखा अंदाज पहिला का?
जिओ स्टुडिओ आणि आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट येत्या आठवड्यात चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होण्याकरता सज्ज झाला आहे. हा चित्रपट सिनेगृहात झळकण्याची प्रतीक्षा करणे सिनेरसिकांना दिवसेंदिवस कठीण बनले आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे. हा विनोदी चित्रपट येत्या १ मार्च २०२४ रोजी सिनेगृहांत झळकणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याकरता जिवाचे रान केले. हा कल कायम ठेवत, आमिर खान, चित्रपटाच्या दिग्दर्शक किरण राव आणि चित्रपटातील मुख्य कलाकार नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, लेखिका स्नेहा देसाई यांच्यासह ‘लापता लेडीज’ची टीम या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी आणि चित्रपटाच्या विशेष खेळाच्या आयोजनासाठी पुणे शहराकडे रवाना झाली.
या चित्रपटाच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष खेळाने आणि जाहिरातीसाठी चित्रपटाच्या टीमने तिथे दिलेल्या भेटीने एक माहोल निर्माण केला. पुण्याला ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखले जाते आणि हे लक्षात घेत, या शहराविषयी आदर व्यक्त करत, आमिर खान, किरण राव, लेखिका स्नेहा देसाई आणि चित्रपटातील कलाकारांनी पुणे शहराला भेट देताना मराठमोळा पेहराव परिधान केला होता.
तसेच, संपूर्ण टीममध्ये ‘लापता लेडीज’चा जोश संचारला होता, त्यांनी ‘मोस्टली लापता’ टी-शर्ट परिधान केले होते. ही बाब सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. इतकेच नाही तर चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी चित्रपटातील कलाकारांचे आणि अख्ख्या टीमचे पुण्यात जोरदार स्वागत केले.
पुणे शहरातील विशेष खेळाव्यतिरिक्त, निर्मात्यांनी अलीकडे सीहोर, जयपूर, दिल्ली, लखनौ, आयआयएम बंगळुरू आणि अहमदाबाद येथे या चित्रपटाचे विशेष खेळ आयोजित केले होते. प्रेक्षकांनी उभे राहून चित्रपटाची प्रशंसा केली आणि चित्रपटाची कथा पेश करण्यातील सर्व मुख्य कलाकारांचे कसब आणि कामगिरीचे उदंड कौतुक केले.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्स आणि ‘किंडलिंग प्रॉडक्शन्स’च्या बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे. चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांचे असून, अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होण्याकरता सज्ज आहे.