गोवासिनेनामा 

गोमंतकीय कला व सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष करून तालक बॉलीवूडच्या प्रसारात व्यस्त : विशाल पै काकोडे

मडगाव : “मडगावच्या रवींद्र भवनाची विस्तारित इमारत एका बॉलीवूड अभिनेत्रीला देण्याच्या कथित प्रक्रियेत व्यस्त असलेले रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पुन्हा एकदा गोमंतकीय सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज ख्रिस पेरी यांच्या जयंतीकडे दुर्लक्ष केले आहे,” अशी टीका राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी केली.


गेल्या वर्षीही ख्रिस पेरी यांची जयंती साजरी न केल्याबद्दल आपण रवींद्र भवनाच्या व्यवस्थापनाला जाब विचारला होता, याची आठवण पै काकोडे यांनी करून दिली. सार्वजनिक टीकेनंतरही गोव्याच्या सांस्कृतिक वारशाप्रती संस्थेची उदासीनता कायम आहे. कोकणी संगीत आणि चित्रपटसृष्टीतील ख्रिस पेरी यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन संस्थात्मक पातळीवर त्यांची जयंती साजरी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


सध्या नूतनीकरण सुरू असलेली रवींद्र भवनाची संपूर्ण विस्तारित इमारत एका बॉलीवूड अभिनेत्रीला चित्रपट स्टुडिओ उभारण्यासाठी व चालविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असा दावा पै काकोडे यांनी केला. याच कारणामुळे रवींद्र भवनाच्या अध्यक्षांनी संगीत, नृत्य, नाट्य व अन्य प्रयोगशील कलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे टाळले असल्याचा आरोपही त्यांनी केला. “योग्य वेळी मी या संपूर्ण कथित षड्यंत्राचा पर्दाफाश करणार आहे,” असे विशाल पै काकोडे यांनी ठामपणे सांगितले.


“मडगावातील एका प्रमुख सांस्कृतिक संस्थेला याच शहरातील एका दिग्गज संगीतकाराच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान करण्याचे वारंवार विस्मरण व्हावे, ही लज्जास्पद बाब आहे. बॉलीवूडमधील व्यक्तींना सामावून घेण्यासाठी दिसणारा उत्साह आणि दुसरीकडे गोमंतकीय सांस्कृतिक दिग्गज व स्थानिक उदयोन्मुख कलाकारांकडे होणारे दुर्लक्ष, यातून अध्यक्षांचे चुकीचे प्राधान्यक्रम स्पष्ट होतात,” असे पै काकोडे म्हणाले.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कला व संस्कृती मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून गोमंतकीय कलाकारांच्या हितांचे रक्षण करावे, अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली. गोव्याच्या कला आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी रवींद्र भवनाची स्थापना करण्यात आली आहे; गोमंतकीय सांस्कृतिक वारशाच्या हिताला तिलांजली देऊन बॉलीवूडमधील व्यक्तींचे व्यावसायिक हितसंबंध जोपासण्यासाठी नव्हे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!