विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे ‘या’ प्रमुख विषयावर खाजगी ठराव
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी 2 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या आठव्या गोवा विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनासाठी पाच खाजगी सदस्य ठराव मांडले आहेत. जर ठराव सभापती रमेश तवडकर यांनी दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. सोडत पद्दतीने निवडलेल्या खासगी ठरावांची यादी 25 जानेवारी 2024 रोजी जारी केली जाईल.
पक्षांतरविरोधी कायद्यातील दुरुस्तीवरील त्यांच्या पहिल्या खाजगी सदस्य ठरावात,विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी “विलीनीकरण” ही संकल्पनाच काढून टाकण्याची आणि विधानसभेच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नियुक्त केलेल्या न्यायाधीशाकडे तर संसदेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशानी नियुक्त केलेल्या न्यायमूर्तींकडे पक्षांतरासंबधी प्रकरणांची निर्णय प्रक्रिया सोपवण्याची गरज व्यक्त केली आहे.
देशाच्या निवडणूक आयोगाने गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी विधानसभा मतदारसंघ अधिसूचित करावेत यासाठी कायद्यातील सर्व उपलब्ध तरतुदींचा शोध घेऊन सरकारने त्यासंबंधी कारवाई करावी, असे युरी आलेमाव यांनी त्यांच्या दुसऱ्या खाजगी सदस्य ठरावात म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेसमोर सर्व भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याची प्रक्रिया जलद करण्याची आणि त्यादरम्यान ज्या गोमंतकीयांनी आपली पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी केली आहे पण ज्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट नाही अशा सर्वांना ओसीआय दर्जा देण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्र सरकारला करण्याची शिफारस आपल्या तिसऱ्या खाजगी सदस्य ठरावात केली आहे.
दरवर्षी 16 जानेवारी रोजी “अस्मिताय दिन – ओपिनियन पोल डे” सरकारी पातळीवर साजरा केला जावा यासाठी चौथा खाजगी सदस्य ठराव विरोधी पक्षनेत्यांनी दाखल केला आहे. केवळ ओपिनियन पोलमुळेच आज आपण स्वत:ला गोवा राज्याचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणू शकतो असे नमूद करुन युरी आलेमाव यांनी सदर ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे ठरावात म्हटले आहे.
विधानसभेच्या मार्च अधिवेशनात विधवा भेदभाव, विधवा अत्याचार आणि विधवांचे अलगीकरण यावरील त्यांच्या यापूर्वीच्या खाजगी सदस्य ठरावावर चर्चा झाली असली तरी, महिला व बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी युरी आलेमाव यांना आश्वासन देऊनही सरकारने अपेक्षित कायदा आणण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे परत एकदा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अन्यायकारक प्रथा रोखण्यासाठी ठराव मांडला आहे.
सदर ठरावात नाईक-डिचोलकर कुटुंबातील आपली कन्या डॉ. गौतमी व डॉ. प्रथमेश यांचे लग्नविधी करणाऱ्या उषा नाईक यांचा विशेष उल्लेख आहे.