‘का’ फटकारले प्रभव नायक यांनी नाव न घेता मडगावच्या आमदारांना?
मडगाव :
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा, २३ जुलै २०२४ चा आदेश असूनही, आकें भागातील शाळकरी मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना धोकादायक ठरलेल्या झाडांची छाटणी करण्यास साबांखाला अपयश. एकंदर प्रकार हा सरकारची सुस्तता की मडगावातील ज्येष्ठ राजकारण्याच्या राजकीय दबावाने सार्वजनीक बांधकाम खात्याला फांद्या कापण्यापासून रोखले आहे? असा संतप्त सवाल युवा नेते प्रभव नायक यांनी विचारला आहे.
22 जुलै 2024 रोजीच्या त्यांच्या पत्राचा आणि त्यानंतरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संदर्भ देत प्रभव नायक यांनी आकें भागातील झाडांची छाटणी करण्याचे काम राजकीय दबावामुळे न केल्याबद्दल सार्वजनीक बांधकाम खात्याला दोष दिला.
सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार कर्तव्य बजावले पाहिजे. मी माझे वैयक्तिक काम करण्यास सरकारला सांगितले नव्हते, मी जी मागणी केली होती ती निव्वळ मडगावच्या नागरिकांच्या हितासाठी होती. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना नागरीकांना धोकादायक ठरलेल्या झाडांची छाटणी करण्यापासून कोणी कसे परावृत्त करू शकते? असा प्रश्न प्रभव नायक यांनी विचारला आहे.
खरे तर हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे, मग ते नगरसेवक असोत की आमदार असोत. नागरिकांना नेहमीच सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करणे हे त्यांचे काम आहे. आकेंतील धोकादायक झाडांची कोणीही दखल न घेतल्याने मला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहावे लागले, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
या विषयावर मला राजकारण करायचे नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर जवळपास २५ दिवस झाडे छाटणीचे साधे काम करण्यास विलंब होत असल्याचे पाहून मला राग आला आणि वेदनाही झाल्या. गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे, मला आशा आहे की अधिकारी आता तरी जागे होतील आणि सदर काम पुर्ण करतील, असे प्रभव नायक म्हणाले.
मडगाव नगरपालीकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने रस्त्यालगतचे गवत कापून, नाल्यांची साफसफाई करून मडगावमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी असे मत प्रभव नायक यांनी म्हटले आहे.