गोवा

प्रियोळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी संजीवनी तळेकर

फोंडा :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी विविध मोर्चांच्या कार्यकारिण्यांची नव्याने निवड प्रक्रिया हाती घेतली असून, त्याअंतर्गत प्रियोळ मतदारसंघातील भाजप महिला मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.


नव्या कार्यकारिणीनुसार संजीवनी तळेकर यांची प्रियोळ भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वर्षा नाईक आणि हर्षा गावडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गौरी गांवकर आणि श्रेया कोलेकर यांची सचिवपदी, तर माधुरी गावडे आणि कांचन केरकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, १६ महिला कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


ही कार्यकारिणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर आणि भाजप गोवा प्रदेश उपाध्यक्ष विश्वास सतरकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीवर पक्ष संघटनेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच महिलांना संघटित करण्यासाठी नव्या कार्यकारिणीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध सामाजिक, जनजागृतीपर आणि महिला सक्षमीकरणाशी निगडित उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या या फेरबदलांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रियोळ मतदारसंघात महिला मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!