अर्थमत/ टेक्नॉलॉजीगोवा

गोव्यात भारतातील पहिली ‘एज सिटी’

मांद्रेत ६० देशांतील ८०० नवोन्मेषक एकत्र येणार

पणजी : गोव्याला भारताची ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उत्तर गोव्यातील मांद्रे येथे भारतातील पहिल्या ‘एज सिटी’ (Edge City) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या तीन आठवड्यांच्या कार्यक्रमात भारतासह ६० हून अधिक देशांतील सुमारे ८०० उद्योजक, शास्त्रज्ञ, संशोधक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञानतज्ज्ञ सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

पर्यटनासोबतच गोव्यातील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप परिसंस्थेला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सामायिक कार्यस्थळे, संशोधन, कार्यशाळा आणि हॅकेथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रगत तंत्रज्ञान आणि उद्योजकतेशी संबंधित प्रकल्पांवर काम केले जाणार आहे.

माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत या सहकार्याची घोषणा केली. गोव्याची ओळख केवळ पर्यटनस्थळ म्हणून न राहता, काम, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग उभारणीचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक व्यवसायांसाठी AI संशोधन

‘ग्राउंड फ्लोअर’ या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय AI तज्ज्ञ गोव्यातील व्यावसायिक, सरकारी प्रतिनिधी आणि संशोधकांसोबत काम करणार आहेत. स्थानिक व्यवसाय आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, याचा अभ्यास केला जाणार आहे.

२८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान AI आणि क्रिप्टो तंत्रज्ञानावर आधारित हॅकेथॉनही आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअप संस्थापकांसाठी मार्गदर्शन आणि नव्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर करण्याच्या संधीही उपलब्ध असतील.

गोवा AI मिशन २०२७ आणि गोवा AI धोरण २०२६ यांच्याशीही या उपक्रमाची सांगड घालण्यात आली आहे. तसेच २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी गोवा AI टेक कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘वर्क फ्रॉम गोवा’ संकल्पनेला बळ देत, आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांचे दीर्घकालीन वास्तव्य वाढविणे आणि स्थानिक पर्यटन, निवास, रेस्टॉरंट्स व वाहतूक क्षेत्राला चालना देणे, हेही या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. मात्र, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने याचे प्रत्यक्ष परिणाम कार्यक्रमानंतर स्पष्ट होतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!