गोवा

रशियन चार्टर विमानांच्या आगमनाने गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला सुरुवात

वास्को : रशियन चार्टर विमानांच्या आगमनाने गोव्यातील २०२६-२७च्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रशियातील येकातेरिनबर्ग आणि मॉस्कोहून चार्टर विमाने दाखल झाली असून, त्यामुळे हॉटेल, टॅक्सी, रेस्टॉरंट, शॅक आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 

एअरोफ्लॉटचे पहिले चार्टर विमान ३० सप्टेंबर रोजी येकातेरिनबर्गहून दाबोळी येथे दाखल झाले. या विमानातून १६२ रशियन पर्यटक गोव्यात आले. त्यानंतर मॉस्कोहून आलेल्या थेट विमानातून २८५हून अधिक प्रवासी गोव्यात दाखल झाले. विमानतळावर पर्यटकांचे पारंपरिक गोमंतकीय संगीत आणि पुष्पहारांनी स्वागत करण्यात आले.

रशिया, कझाकस्तानमधून पर्यटकांचा ओघ

रशिया ही गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. यंदाच्या हंगामात एअरोफ्लॉटकडून मॉस्को आणि येकातेरिनबर्गहून चार्टर सेवा सुरू राहणार आहेत. कझाकस्तानमधूनही चार्टर सेवा सुरू होणार असून, स्कॅट एअरलाइन्सची अल्माटी-दाबोळी सेवा २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तसेच एअर अस्तानाची अस्ताना-मोपा सेवा ३० डिसेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. 

आंतरराष्ट्रीय चार्टर विमानांच्या वाढत्या संख्येमुळे आगामी पर्यटन हंगामात राज्यातील पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना फायदा होण्याची शक्यता आहे. दाबोळी विमानतळावर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सुमारे १४४ आंतरराष्ट्रीय चार्टर विमाने दाखल होण्याची अपेक्षा असून, त्यातून सुमारे २५,९२० विदेशी पर्यटक गोव्यात येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

चार्टर विमानांसाठी दोन कोटींचे प्रोत्साहन

आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क वाढवण्यासाठी गोवा सरकारने चार्टर विमानांसाठी दोन कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. रशिया, पोलंड आणि कझाकस्तानसह नोव्हेंबरपासून ब्रिटनमधील मँचेस्टर आणि लंडन गॅटविक येथूनही चार्टर सेवा सुरू होण्याची अपेक्षा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केली आहे.  

दरम्यान, रशियातील सायबेरिया भागात न्यूमोनिक प्लेगचा संशय व्यक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर दाबोळी विमानतळावर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विमानतळावर थर्मल स्क्रिनिंगसह आवश्यक आरोग्य तपासणीची व्यवस्था तयार ठेवण्यात आली असून, सध्या जागतिक आरोग्य संघटना किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रवासविषयक सूचना जारी झालेली नसल्याचे वृत्त आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!