google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…सर्व ४० आमदारांच्या राजीनाम्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा पुढाकार’

पणजी :

म्हादईसाठी गोव्याचे हित जपण्यासाठी सर्व ४० आमदारांच्या राजीनाम्यांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढाकार घ्यावा. म्हादई आपली आई म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.



काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आणि आमदार एल्टन डिकोस्टा आणि अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा यांच्यासोबत कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी गोव्याची जीवनदायीनी म्हादईबाबत भाजपने नेहमीच गोव्याच्या हिताशी तडजोड केल्याचा आरोप केला. कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने कर्नाटक राज्याला दिलेल्या मंजुरीवर तिव्र प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस नेत्यांनी भाजप सरकारने गोव्याचा विश्वास केल्याचे सांगितले.



आगामी विधानसभा अधिवेशनाचे कामकाजाचे दिवस वाढवावेत व एक संपूर्ण दिवस म्हादई प्रश्नावर चर्चेसाठी द्यावा. विधानसभेत म्हादई जलतंट्यासंबंधीत सर्व कागदपत्रे सरकारला सादर करू द्या असे सांगून, या गंभीर मुद्द्यावर एकत्रित भूमिका घेण्यासाठी मी सर्व विरोधी आमदारांशीही बोलणार असल्याची माहिती युरी आलेमाव यांनी दिली.


कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी तत्कालीन भाजप नेते बीएस येदुरप्पा यांना पत्र लिहून म्हादईवर कर्नाटकशी तडजोड केली होती, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नेहमीच कर्नाटकला वरचढ केले आणि गोव्यातील भाजपचे स्थानिक नेते गप्प बसले हे कागदपत्रे सिद्ध करतात असे कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

काँग्रेसमध्ये असताना म्हादईवर आवाज उठवणाऱ्या आठ पक्षबदलुनी आता बोलावे, अशी माझी मागणी आहे. ते गप्प का आहेत? असा सवाल आमदार एल्टन डिकोस्टा यांनी केला. कृषिमंत्री रवी नाईक यांना आता त्यांचे “जल निर्यात धोरण” रद्द करुन “पाणी आयात धोरण” राबवावे लागेल असा टोला एल्टन डिकोस्टा यांनी हाणला.


केंद्र सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आम्ही शोधू. एकापाठोपाठ आलेल्या भाजप सरकारांनी नेहमीच म्हादईचा गळा घोटला जात असताना आनंदोत्सव साजरा केला. म्हादईच्या गोंधळाला माजी जलसंपदा मंत्री विनोद पालयेकर हेही जबाबदार होते, असे अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा म्हणाले.

केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सक्रिय आणि जलद पावले उचलली नाहीत तर काँग्रेस पक्ष सर्व गोमंतकीयांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन करेल, अशी माहिती सर्व काँग्रेस नेत्यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!