
अर्थसंकल्प मडगावसाठी “थोडा गोड आणि जास्त आंबट” – प्रभव
मडगाव :
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मडगावसाठी “थोडा गोड आणि जास्त आंबट” आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मडगावकरांच्या भावनांचा आदर करण्याचे आणि सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करतो, असे मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना, प्रभव नायक यांनी मडगाव दिंडी महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचे स्वागत केले परंतु दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या सुसज्जतेसाठी सरकारने नगण्य ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल टीका केली.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सर्व राज्य महोत्सवांना त्यांची विशिष्ट ओळख जपण्यासाठी पुरेसे आर्थिक सहाय्य आणि पाठिंबा देण्याची विनंती करतो. पारंपारिक उत्सवांचे व्यापारीकरण आपण करू देऊ नये, असे प्रभव नायक म्हणाले.
हॉस्पिसियो दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या अपग्रेडेशनसाठी फक्त ५ कोटी रुपयांची तरतूद पाहणे धक्कादायक आहे. दक्षिण गोव्यातील लोकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत, परंतु सरकारचे प्राधान्य मडगावच्या आमदारानी स्वार्थासाठी आयोजित केलेल्या इव्हेंटसवर उढळपट्टी करण्यास आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
७ वर्षांची सेवा बजावलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांना “टेंपररी” दर्जा देणे पुरेसे नाही. सर्व सरकारी विभागांमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा सरकारने “नियमित” कराव्यात, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली.
सरकारने मडगाव नगरपालिकेच्या वारसा इमारतीची दुरुस्ती करण्याची घोषणा केली असली तरी, तेथील कोलमडलेले प्रशासन रुळावर आणण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची तातडीची गरज आहे, असे प्रभव नायक म्हणाले.
सर्व सरकारी नोकरभरती कर्मचारी निवड आयोगामार्फतच करण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली अर्थसंकल्पीय घोषणा स्वागतार्ह आहे. मडगाव नगरपालीकेच्या सर्व नोकरभरती आता आयोगानार्फतच कराव्यात जेणे करुन पारदर्शकता येईल आणि घराणेशाहीला आळा बसेल असे प्रभव नायक म्हणाले.