हॉस्पिसीयो इस्पितळात रुग्णांचे हाल सुरूच : प्रभव नायक
मडगाव :
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात रुग्ण आणि नातेवाइकांचे वेदनादायी हाल नित्याचेच झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे भाजप सरकार नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत असंवेदनशीलता दाखवत आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मडगावचो आवाजने सुचविलेल्या उपाययोजनांवर कृतीशीलपणे कार्यवाही करावी, अशी मागणी युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.
आणीबाणीच्या काळात रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास किंवा हॉस्पिसिओमधून रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यास होत असलेल्या विलंबावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, प्रभव नायक यांनी भाजप सरकारच्या असंवेदनशील दृष्टिकोनावर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्णपणे कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारवर टीका केली.
मडगावचो आवाजच्या पुढाकाराने मडगावच्या नागरीकांनी त्यांना निवेदन सादर केल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हॉस्पिसीयोला दोन रुग्णवाहिका पाठविण्याचे जाहिर केले होते. नंतर त्यांनी स्वत: पणजीत सीएसआर अंतर्गत २१ प्रगत रुग्णवाहिका कार्यांवित केल्या आणि सदर रुग्णवाहिकांमूळे आपत्कालीन काळजी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे घोषीत केले. दुर्दैवाने या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात एकही नवीन रुग्णवाहिका पोहोचलेली नाही, असा दावा प्रभव नायक यांनी केला.
गुरुवारी, प्रसूती वेदना सहन करत असलेल्या गर्भवती महिलेला मडगाव रेल्वे स्थानकापासून हॉस्पिसिओपर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. नंतर तिला कमल उर्फ मुन्ना खान या व्यक्तीने तिच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था केली आणि तिला सुरक्षितपणे रुग्णालयात आणून देवदूतासारखी सेवा बजावली असे प्रभव नायक यांनी सांगितले.
शुक्रवारी परिस्थितीत काहीही बदलले नाही. पाय फ्रॅक्चर असलेल्या एका तरुण रुग्णाला हॉस्पिसीयोतून शस्त्रक्रीयेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची वाट पाहत जवळपास 3 तास प्रतीक्षा करावी लागली. सदर रुग्णाचे कसे हाल झाले त्याची चित्रफीत उपलब्ध आहे, असे प्रभव नायक म्हणाले.
जेव्हा हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना गोमेकोत पाठवले जाणे म्हणजे दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात सुवीधा नसल्याचे स्पष्ट होते. लोकांना योग्य आरोग्यसेवा देण्याचे गोवा सरकारचे मोठे दावे पूर्णपणे फोल ठरतात. आता तरी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लक्ष घालून इस्पितळ पुर्ण क्षमतेने चालू करण्याची वेळ आली आहे, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.