पहिल्याच प्रचारसभेत विरियातो भाजपवर कडाडले…
मडगाव :
दक्षिण गोव्यातील जनता माझा विजय निश्चित करतील. भाजपची वक्रदृष्टी दक्षिण गोव्यावर आहे ज्यामुळे पर्यावरण, जंगल आणि वन्यजीवांचा नाश झाला आहे. भाजपला दाबोळी विमानतळ बंद करायचा असून गोव्यातील प्रत्येक इंच जमीन बळकावायची आहे. आता गोव्याला भाजपपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी लोहिया मैदान, मडगाव येथे बोलताना केले.
इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरीयातो फर्नांडिस आणि ॲड. रमाकांत खलप आणि इतर नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात म्हणून लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकोस्ता आणि ॲड.कार्लोस फरैरा, कॉंग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर, आपचे अध्यक्ष अमित पालेकर, आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जूझे फिलिप डिसोझा, गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, तृणमूल कॉंग्रेसचे समील वळवईकर, शिवसेनेचे जितेश कामत, माजी मंत्री एलिना साल्ढाना , ॲड. प्रतिमा कुतिन्हो आणि इतर विविध विरोधी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हुकूमशहा मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला सत्तेवरून कायमचे हटवून लोकाभिमुख इंडिया सरकार स्थापन करण्यासाठी आजपासून क्रांती सुरू झाली आहे. गोवा आमच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला.
18 जून 1946 मंगळवार होता जेव्हा डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियाव मिनेझिस यांनी याच लोहिया मैदानातून गोवा क्रांती आंदोलन सुरू केले. आज मंगळवार आहे आणि आम्ही हुकूमशाही भाजप विरोधात क्रांती सुरू करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री जूझे फिलीप डिसोझा म्हणाले की, विरोधक एकजूट असून भविष्यातही आमचे ऐक्य कायम राहिल. मी प्रत्येक गोमंतकीयाला इंडियाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.
आगामी लोकसभा निवडणुकीची लढाई 100 कौरव आणि 5 पांडवांमधील आहे. आमच्याकडे उमेदवार म्हणून एक निवृत्त नौदल अधिकारी आहे जो देशासाठी आपले बलिदान देण्यास तयार आहे असे गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक म्हणाले.
आपचे अध्यक्ष अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, तृणमूल कॉंग्रेसचे समिल वळवईकर आणि इतरांनीही कॅप्टन विरियातो फर्नांडिस आणि ॲड. रमाकांत खलप यांना जाहिर पाठिंबा व्यक्त केला.
नंतर दोन्ही उमेदवारांनी श्री पिंपळकट्टा येथे जाऊन देव दामोदराकडे प्रार्थना केली. दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर आदींनी न्यू मार्केटला भेट देऊन दुकानदार आणि विक्रेत्यांशीही संवाद साधला.