घनदाट जंगलात आढळला ‘त्या’ तरूणीचा मृतदेह…
पर्वरीतील कामाक्षी या तीस वर्षीय तरूणीचा प्रेम प्रकरणातून माजी प्रियकरानेच निर्घूण खून केल्याची घटना उघड झाल्यावर राज्यात खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसातील राज्यातील ही खूनाची पाचवी घटना आहे.
कामाक्षीचा माजी प्रियकर असलेल्या प्रकाश चुंचवाड (वय 22) यानेच हा खून केल्याचे समोर आले आहे. त्याने कामाक्षीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकला होता. म्हापसा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खूनाची माहिती मिळाल्यानंतर आज, शुक्रवारी सकाळीच पोलिसांचे फॉरेन्सिक पथक आंबोलीच्या दिशेने रवाना झाले होते. पोलिसांनी प्रकाश चुंचवाड याला अटक केली आहे. दुपारी चुंचवाड याच्या माहितीनुसार मृतदेहाचा शोध घेतला जात होता. काही वेळाच्या शोधानंतर पोलिसांना मृतदेह सापडला.
दोन दिवसांपुर्वी कामाक्षी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटूंबियांनी पोलिसात केली होती. त्यांनी पर्वरीत गॅरेज चालवणाऱ्या प्रकाश चुंचवाड याच्यावर संशय व्यक्त केला होता. दरम्यान, खुनाच्या काही तास आधी कामाक्षी हीने म्हापसा पोलिसात तिच्यावर हल्ला झाल्याची तक्रार केली होती.
दरम्यान, मृतदेह रस्त्याकडेला झाडीत फेकला गेला होता. जंगल असल्यामुळे याबाबत कुणालाही काहीही संशय आलेला नव्हता. मृतदेह काढताना येथे बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता तो उत्तरीय तपासणीसाठी गोव्यात आणण्यात येणार आहे.