
मडगाव नगरपालिकेने श्वेतपत्रिका जारी करण्याची ‘मडगावचो आवाज’ची मागणी
मडगांव :
मडगावचो आवाजने मडगाव नगरपालिकेला एक निवेदन सादर करुन व्यापार परवाने, बांधकाम परवाने, स्वच्छता शुल्क आणि इतर नगरपालिका शुल्कांसह करांमध्ये केलेली मोठी वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे आणि मडगांव नगरपालिकेने गेल्या ४ वर्षात प्रदान केलेल्या सेवा आणि नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन यावर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे.
मडगाव नगरपालिकेने कर आणि शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच १ मार्च २०२५ रोजी मडगावचो आवाजने केलेल्या मागण्यांचा संदर्भ देत, युवा नेते प्रभव नायक यांनी स्वाक्षरी केलेल्या व मुख्याधिकाऱ्यांना उद्देशून लिहीलेल्या निवेदनात मडगाव नगर पालिका देत असलेल्या वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, स्वच्छ शौचालये आणि कपडे बदलण्याच्या खोल्यांची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची सोय, बाजारपेठांची देखभाल आणि सुरक्षा, वाहतूक बेटे आणि सार्वजनिक ठिकाणांची देखभाल, बेकायदेशीर आणि अनियमिततेविरुद्ध कारवाई आणि नगरपालिका कर्मचारी आणि नगरसेवकांचे कामगिरी मूल्यांकन यांवर श्वेतपत्रीका काढण्याची मागणी केली आहे.
या दरवाढीमुळे कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे आणि मडगाव नगर पालिकेच्या आश्रयाने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या सर्वांना फायदा मिळत आहे. मडगाव नगर पालिेकेत संपूर्ण गैरव्यवस्थापन आहे जे ऑडिट अहवालात अधोरेखित झाले आहे. मडगाव नगरपालिका सार्वजनिक ठिकाणांची देखभाल करण्यात, नागरिकांना कालबद्ध सेवा देण्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार बंद करण्यात अपयशी ठरले आहे, असे प्रभव नायक यांनी निवेदनात म्हटले आहे.
गेल्या १५ मध्ये शुल्क आणि कर वाढवले गेले नाहीत असा दावा मडगाव नगरपालिका करीत आहे. आता करवाढ करण्याऐवजी मागच्या पंधरा वर्षात मडगाव नगरपालिकेने देण्यात येणाऱ्या सुविधांत काय सुधारणा केली ते स्पष्ट करावे. पालिकेचा कारभार पुर्वीपेक्षा आता कोलमडला आहे व भ्रष्टाचार वाढला आहे. शहराची देखभाल, व्यवस्थापन व प्रशासनात काय सुधारणा केल्या ते मडगाव नगरापालिकेने श्वेतपत्रीकेत स्पष्ट करावे अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.
मडगाव नगरपालीकेने त्वरित शुक्ल व करवाढ मागे घ्यावी आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या नागरीकांना दिलासा द्यावा, असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.