google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘आंतोन वाझ यांनी सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करावा’

मडगाव :

सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरला कोणतीही वैध परवानगी नसल्याचा खुलासा कुठ्ठाळाचे आमदार आंतोन वाझ यांनी केल्याने भाजप सरकारचे प्रशासन कोलमडल्याने गुन्हेगार व माफियांना पूर्णपणे मोकळे रान मिळालेले आहे हे परत एकदा स्पष्ट झाले आहे. कुठ्ठाळीच्या आमदाराने अकार्यक्षम व भ्रष्ट भाजप सरकारला दिलेल्या समर्थनाचा आत्मपरीक्षण करुन पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

कुठ्ठाळीच्या आमदाराने बोलावलेल्या बैठकीचा एक व्हिडिओ जारी करून, काँग्रेस अध्यक्षांनी आरोप केला की सांकवाळ येथील नागरिकांच्या सतर्कतेने सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्यानंतर 5 दिवस उलटूनही, सरकारचे आरोग्य, जलस्त्रोत, वाहतूक आणि पोलिस खात्याच्या अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

सरकारचा प्रत्येक विभाग व खाते दुसऱ्यांकडे बोट दाखवत असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होते. त्यांनी आजपर्यंत सदर टॅंकरातून नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. वाहतूक अधिकाऱ्यांना सदर टँकरची नोंदणी रद्द करण्यापासून आणि चालक परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.

सर्व अपक्ष आमदारांनी तसेच भ्रष्ट भाजपा सरकारला पाठिंबा देणाऱ्या इतर बिगरभाजप आमदारांनी “आरोग्य हीच संपत्ती” हे लक्षात घेतले पाहिजे आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे हे जाणले पाहिजे. गोव्यात भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळून सांडपाणी टँकर माफियांना प्रोत्साहन देत आहे. अपक्ष व बिगर भाजप आमदारांनी आताच शहाणे व्हावे व “भाजपच्या पापांचे” वाटेकरू होऊ नये असे सल्ला अमित पाटकर यांनी दिला आहे.

हवा, पाणी आणि अन्न या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जनतेला शुद्ध आणि आरोग्यदायी पिण्याचे पाणी देण्यात अपयशी ठरले आहे. या कडक उन्हाळ्यात महिलांना पाण्याचे एक भांडे भरण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे अमित पाटकर म्हणाले.

काँग्रेस पक्ष सरकारवर दबाव कायम ठेवेल. सार्वजनीक बांधकाम विभाग आणि एफडीएला बेकायदा टॅंकर माफीयांबद्गल जाब विचारून कृती करण्यास लावल्या नंतर, आम्ही लवकरच जलस्रोत आणि आरोग्य विभागांकडे जाणार असून, भाजप सरकारने प्रोत्साहन दिलेल्या गोव्यातील सांडपाणी आणि टँकर माफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहोत असे अमित पाटकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!