‘महादेव देसाईना जना-कॉंग्रेसवर बोलण्याचा अधिकार नाही’
काणकोण :
तृणमुल कॉंग्रेसचे आयात केलेले पराभुत उमेदवार महादेव देसाई यांनी कॉंग्रेसचा विश्वासघात केला असुन, त्यांना कॉंग्रेस पक्ष व आमचे नेते जनार्दन भांडारी यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असा पलटवार काणकोण कॉंग्रेसचे गट अध्यक्ष प्रलय भगत यांनी केला आहे.
काल कॉंग्रेसच्या चेतना यात्रेला हजर राहिल्यानंतर कॉंग्रेस पक्ष व जनार्दन भांडारीवर तृणमुलचे पराभुत उमेदवार महादेव देसाई यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, कॉंग्रेस गट अध्यक्षानी महादेव देसाईंच्या वक्तव्याचा तिव्र निषेध केला आहे.
काणकोण मतदारसंघात केवळ १०६६ मते घेणाऱ्या महादेव देसाईना त्यांच्या लोकप्रियतेवर बोलण्याचा अधिकार नाही. गत विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांवरुनच त्यांनी काणकोणात काय कार्य केले हे स्पष्ट होते अशी बोचरी टीका प्रलय भगत यांनी केली आहे.
केवळ आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी महादेव देसाई यांनी कॉंग्रेस पक्षाचा विश्वासघात करुन तृणमुलची उमेदवारी घेतली. अशा विश्वासघातकी व स्वार्थी महादेव देसाईना, कॉंग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते जनार्दन भांडारी यांच्यावर बोलण्याचा नैतीक अधिकार नाही असा टोला प्रलय भगत यांनी हाणला आहे. कॉंग्रेस पक्षाची असलेली निश्टा, मागील ३० वर्षे तळागाळात केलेले काम याची पावती म्हणुनच जनार्दन भांडारी यांना कॉंग्रेसने यंदा उमेदवारी दिली असा दावा प्रलय भगत यांनी केला आहे.
आमचे नेते जनार्दन भांडारी यांनी काणकोण तसेच संपुर्ण गोव्याचे प्रश्न हातात घेवुन शेकडो आंदोलनांत सक्रीय भाग घेतला असुन, प्रसंगी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही त्यांनी आपली निश्टा व कार्य बदलले नाही हे महादेव देसाईनी ध्यानात ठेवावे. तत्कालीन कॉंग्रेस आमदारानी स्वार्थासाठी पक्षांतर केल्यानंतरही जना भांडारीनी कॉंग्रेसचा झेंडा काणकोणात फडकत ठेवली हे महत्वाचे आहे असे प्रलय भगत यांनी म्हटले आहे.
मडगावच्या एका तथाकथीत “राजकीय गुरू” कडुन शिकवणी घेतल्याने निवडणुक जिंकता येत नाही. जनसामान्यांत मिसळून लोकांचे प्रश्न सोडवुनच जनतेचा विश्वास संपादन करता येतो हे महादेव देसाई यांनी शिकणे गरजेचे आहे असे सल्ला प्रलय भगत यांनी दिला आहे.
काणकोण गट कॉंग्रेस समिती तसेच सर्व फ्रंटल संघटनाचा आमचे धडाडीचे नेते जनार्दन भांडारी यांना पुर्ण पाठिंबा असुन, कॉंग्रेसचे नवे नेतृत्व दगाबाज व विश्वासघातक्यांच्या कारस्थानाना बळी पडणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. कॉंग्रेसच्या नवीन नेतृत्वाने पक्षासाठी तन-मन-धन दिलेल्या तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा आदर करावा व पक्ष बळकट करण्यासाठी पाऊले उचलावीत.