
साखळी, फोंडा येथे चुरशीने मतदान
पणजी:
साखळी आणि फोंडा येथे नगरपालिकांसाठी आज, शुक्रवारी (5 मे) मतदान पार पडले. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची मुदत होती. साखळीमध्ये एकूण 87.56 टक्के तर फोंडा नगरपालिकेसाठी एकूण 74.66 टक्के मतदान झाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील नगरपालिका असल्याने साखळी आणि कृषी मंत्री रवी नाईक यांच्या मतदारसंघातील नगरपालिका असल्याने फोंडा या दोन्ही ठिकाणी मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, दोन्ही नगरपालिकांसाठीची मतमोजणी रविवारी 7 मे रोजी आहे.
सायंकाळी चार ते पाच हा अखेरचा तास कोरोनाची बाधा झालेल्या मतदारांसाठी राखीव होता. साखळी नगरपालिकेत एकूण 12 जागा असून त्यापैकी 2 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. तर फोंडा नगरपालिकेत 15 जागा असून तिथेही दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे साखळीतील 10 आणि फोंड्यातील 13 अशा एकूण 23 जागांसाठी मतदान पार पडले.