
‘खंडाळ्यातील शेतकऱ्यांचा वीज प्रश्न लवकरच मिटणार’
सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यातील खंडाळा तालुका हा वाढत्या औद्योगीकरणामुळे राज्याच्या नकाशावर नावारूपास येत आहे, मात्र खंडाळा तालुक्यातील औद्योगिक व शेती या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने वीज प्रश्नाबाबत नेहमीच शोकांतिका राहिली आहे. यावरूनच शेती व औद्योगीकरण या दोन्ही क्षेत्रांमधील वीजप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयावर गांभीर्याने लक्ष देत महावितरण विभागाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांवरील विजेचा दुष्काळ लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनामध्ये खंडाळा तालुक्यातील वीजप्रश्नासाठी भरीव तरतुदीच्या प्रमुख मागणीसह जेजुरी येथील अर्धवट दोन टॉवरचे काम लवकर मार्गी लावणे जेणेकरून शिरवळ उपकेंद्र लोणंदला जोडण्यात येईल, शिरवळ येथील 132 के.वी. उपकेंद्रामध्ये तातडीने आयसोलेटर बसवणे, शिरवळ ता. खंडाळा येथील 132 के.वी. उपकेंद्रामधील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे या कामाबाबत पाठपुरावा पुरुषोत्तम जाधवांकडून करण्यात आला.

वीजप्रश्नावर पुरुषोत्तम जाधव म्हणाले कि, खंडाळा तालुक्यामध्ये नुकतेच धोम बलकवडी व निरा देवधर या प्रकल्पाचे पाणी आल्याने आत्ता कुठे कृषी क्षेत्रामध्ये बळीराजाची प्रगती चालू झाली आहे, मात्र महावितरणकडून विजेबाबत चाललेल्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची अवस्था पुरती गोंधळलेली आहे. शेतीवीज दिवसा असो किंवा रात्री त्यातही अर्धवेळ बऱ्याचदा वीज गेलेलीच असते. वास्तविक पाहता शेतीसाठी लागणारी वीज हा बळीराजासाठी अतिमहत्त्वाचा प्रश्न असून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका संपूर्ण शेतकरी वर्ग सोसत आहे, मात्र लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
तसेच या कामांसोबतच खंडाळ्याच्या पश्चिम भागातील 14 गावांसाठी सध्या 22 के.वी जवळे गावठाण ही एकच वाहिनी असून या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यास परिसरातील १४ गावे बाधित होतात त्यामुळे लोहम या ठिकाणी 33/22 के.वी. क्षमतेचे उपकेंद्र केंद्र सरकारच्या योजनेमध्ये प्रस्तावित असून सदर उपकेंद्रास तातडीने मंजुरी मिळावी तसेच
31/22 म्हावशी उपकेंद्रातील ५ एम. व्ही.ए. रोहित्राचा १० एम.व्ही.ए. करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.